आणे पठारावर पाण्याची तीव्र टंचाई; आणे, पेमदरा, नळवणे, शिंदेवाडी गावात टँकर सुरू
1 min readआणे दि.२:- जुन्नरच्या पूर्व भागातील पठार भागावर असलेले आणे, नळावणे, आनंदवाडी, पेमदरा येथील जलसाठे कोरडे पडले आहेत. येथील गावांना दोन दिवसांपासून टँकर ने पाणी पुरवठा सुरू आहे. काही भागात विहिरी, कूपनलिका, तलावांतील पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. नदीवरील बंधारे तर केव्हाच उघडे पडले आहेत.
त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण झाली आहे. दुसरीकडे शेतीपिके करपून गेली आहेत. जनावरांचा चाराही मिळेनासा झाला आहे. यंदाच्या वर्षी पठार भागावर सुरुवातीला पाऊस कमी झाल्यामुळे सगळी पिके करपून गेली होती. दुबार केलेली पेरणीसुद्धा वाया गेली होती. अजून जून महिना उजाडायला तब्बल अडीच महिन्यांचा कालावधी बाकी असून, आणखीनच परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता बतीवण्यात येत आहे.
तोपर्यंत पाण्यासाठी तारेवरची कसरत……. दरम्यान, तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी सरकारकडे पाठपुरावा करून ९८ कोटी रुपयांची येडगाव धरणाहून पठारभागापर्यंतच्या सर्व गावांसाठी नव्याने बेल्हे प्रादेशिक योजना मंजूर केली आहे. तिचे काम प्रगतिपथावर असून, भविष्यातील या सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. परंतु, त्यासाठी किमान ३ वर्षे लागू शकतात; तोपर्यंत जनतेची पाण्यासाठी तारेवरची कसरत सुरूच रहाणार आहे.
आणे पठारावरील ओढे, नाले, तलाव, विहिरी आटल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कमी पाण्यावरील पिकांकडे जुन्नरमधील शेतकरी वळले. यंदा पाऊसकाळ कमी झाल्याने डिसेंबर महिन्यातच ग्रामीण भागातील ओढे-नाले, बंधारे, विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत.
जमिनीतील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. दरम्यान, आगामी काळातील पाण्याचा तुटवडा लक्षात घेता, जुन्नरच्या पश्चिम व पूर्व भागातील शेतकरी कमी पाण्यावरील पिकांकडे वळला आहे.गेल्या सात-आठ वर्षांपासून पाऊसकाळ कधी कमी, तर कधी अधिक होत चालले आहे.
यावर्षीचा पावसाळा चांगलाच कोरडा गेल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. गत महिन्यापासून विहिरीतील पाणीपातळी हळूहळू कमी झाली आहे. जंगली प्राण्यांना पिण्यासाठी पाणी सध्या कुठेही उपलब्ध नाही. पेमदारा गावाला वरदान असलेला गाडेकर वस्ती पाझर तलाव गेल्या वर्षभरापासून कोरडा ठाण पडलेला आहे. यंदा त्या तलावात पावसाचे पाणीच आले नाही.
रानावनात असणारे लहान-मोठे ओढे, नाले, बंधारे कोरडे,पाझर तलाव जानेवारी महिन्यातच कोरडे पडले आहेत.
“शासनाने पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सुविधा चालू केली आहे परंतु जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा गंभीर होत चालला आहे. त्यासाठी शासनाकडे चारा डेपो सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे केली आहे. तरी लवकरातील लवकर चारा डेपो सुरू करावा”.
प्रियांका प्रशांत दाते, सरपंच आणे
“पेमदरा गाव व वाड्यावस्त्यावर पाण्याची समस्या गंभीर निर्माण झाली आहे. गावातील बोअरवेल व विहिरींनी तळ गाठला असून दोन दिवसापूर्वी प्रशासनाने टँकरची सुविधा केली आहे.गावाला पाणी पुरवठा करणारी विहिरीने मागच्या महिन्यात तळ गाठला आहे. गावाला वरदान असलेला गाडेकर वस्ती पाझर तलाव गेल्या वर्षापासून कोरडा ठाण आहे.”
जयश्री गाडेकर, सरपंच पेमदरा