वळसे पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ’; ध्येयानुसार वाटचाल केली तर यश मिळते”:- पांडुरंग पवार
1 min readनिमगाव सावा दि.२९:- विद्यार्थ्यांनो आपण जर आपल्या ठरवलेल्या ध्येयानुसार वाटचाल केली तर यश नक्की मिळते. प्रामाणिकपणा, जिद्द, सचोटी, मेहनत या बळावर आपण आपले ध्येय गाठू शकतो.
त्यासाठी आपल्याकडे प्रचंड इच्छाशक्ती हवी.समाजामध्ये अशी आपली वेगळी ओळख निर्माण करा,जेणेकरून आपल्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीची ओळख होईल. ही यांची आई, यांचे वडील असे अभिमानाने समाज आपल्याला संबोधन अशी आपली स्वतःची आपल्या कर्तुत्वावर ओळख निर्माण करा.असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी केले.
तसेच या महाविद्यालयात शिक्षण घेऊन तुम्ही नक्कीच भविष्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय अथवा नोकरीच्या निमित्ताने जीवनक्रमण कराल आणि यासाठी महाविद्यालय, आपले शिक्षक, गुरुजन,आई, वडील यांची महत्त्वाची भूमिका असेल.
अलीकडे आपल्या महाविद्यालयाचा दीपक शेलार हा विद्यार्थी डी.वाय. एस. पी. बनला. समृद्धी आतकरी ही विद्यार्थीनी वनरक्षक झाली, पूजा डुकरे बी. एस. एफ मध्ये तर सारिका ढगे ही मुलगी पोलीस मध्ये रुजू झाली. या विद्यार्थ्यांचा आदर्श आपल्यासमोर असून जेव्हा नदी उगम पावते तेव्हा तो छोटा प्रवाह असतो आणि जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा तो विस्तीर्ण होतो अशी स्थिती आपली असते.
भविष्यात महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून आपले ऋणानुबंध महाविद्यालयाशी कायमचे जोडलेले राहतील पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी शुभकामना पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय पांडुरंग पवार यांनी श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा येथे तृतीय वर्ष कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केली.
यावेळी प्राजक्ता पानसरे, ऋषिकेश वाघ,किशोर येवले, निकिता तांबे,हर्षदा जावळे,शोएब पटेल,विकास पाटोळे या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाप्रती आपले अनुभव आणि आठवणींना उजाळा दिला. तसेच संस्थापकांनी या परिसरामध्ये महाविद्यालय सुरू करून आम्हा विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय केल्याबद्दल ऋण व्यक्त केले.
तसेच याप्रसंगी प्रा.माधुरी भोर,प्रा.नीलम गायकवाड, प्रा.आशिया शेख, प्रा. ज्योती गायकवाड, प्रा.अनिल पडवळ, प्रा.प्रल्हाद शिंदे आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना परीक्षा आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, संचालक संदीप भाऊ थोरात, संस्था प्रतिनिधी कविता पवार महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नंदा आहेर, प्रास्ताविक प्रा. सुभाष घोडे यांनी केले तर प्रा. प्रियंका डुकरे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.