निमगाव सावा शाळेत ‘उमंग प्रश्नमंजुषा स्पर्धा’ संपन्न

1 min read

निमगाव सावा दि.२२:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे ‘हंस व शिक्षणा फाउंडेशन’ तसेच पंचायत जुन्नर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उमंग ‘प्रश्नमंजुषा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती.प्रेरणा फाउंडेशन या संस्थेमार्फत प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची गोडी लागावी तसेच सहकारी मित्रांच्या मदतीने अध्ययनात नैपुण्य प्राप्त व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.या संस्थेमार्फत सहअध्यायी गट आणि प्रेरणा मंच हे उपक्रम राबविण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांना अध्ययनात गोडी लागावी यासाठी अभ्यासक्रमावर आधारित पुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे.विद्यार्थी मोठ्या आवडीने या पुस्तिकेतील अभ्यास करत आहे व आनंद घेत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच नियमित उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रंगाचे स्टार्स परिपाठामध्ये देण्यात येतात. हे स्टार्स शालेय गणवेशावर लावून विद्यार्थी मोठ्या दिमाखाने दिवसभर आनंद घेत असतात.विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा अनुभव यावा या दृष्टीने आज या प्रकारची स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली.यामध्ये विविध प्रकारचे पाच राऊंड घेण्यात आले. अचूकपणे उत्तर देण्याचे धाडस या ठिकाणी पाहण्यात आले. यामधून पुढील कालावधीमध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.या स्पर्धेमध्ये निमगाव सावा केंद्रातील सर्व शाळांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा या शाळेचा प्रथम क्रमांक आला. या उपक्रमासाठी शिक्षणा फाउंडेशनच्या स्वाती शेलार व इतर सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक लहू गोफने , वर्गशिक्षक संतोष साळुंके, शारदा मटाले, जयश्री जावळे, प्रशाली डुकरे, आशा चुकाटे, आणि इतर शाळांतील अनेक शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते.या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख शौकत पटेल, बीट विस्ताराधिकारी विष्णू धोंडगे आणि गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे