ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला कर निरीक्षक
1 min read
अहील्यानगर दि.२०:- पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील ऊस तोडणी कामगाराचा मुलगा सोमनाथ निवृत्ती खेडकर यांची राज्य कर निरीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे. आई-वडिलांबरोबर ऊस तोडणीसाठी गेल्यामुळे सलग दोनदा सहावीत नापास होऊनही सोमनाथने मनोधैर्य खचू दिले नाही. परिस्थिती बदलण्याचा ठाम निश्चय करत सोमनाथ मैदानात उतरला अन् जिंकलाही.
परिस्थितीवर मात करत सोमनाथने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्याने मिळवलेल्या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. वडील निवृत्ती खेडकर व आई ठकुबाई यांनी केलेल्या कष्टाचे चीज झाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
मुलाच्या शिक्षणासाठी मुबलक पैसा व चांगली शिक्षण सुविधा देऊ शकलो नाही ही खंत व्यक्त करत मुलाने परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या यशाचा अभिमान वाटतो, हे सांगताना आई-वडिलांना अक्षरशः हुंदके अनावर झाले.
दोघेही अशिक्षित असले तरी मुलाच्या भविष्यासाठी त्यांचे विचार परिस्थितीवर रडणाऱ्यांसाठी विद्यापीठ बनले आहेत. सोमनाथचा मोठा भाऊ रामनाथ पुणे येथे खासगी कंपनीत काम करतो. आपल्या यशात भाऊ व भावजाईचा मोठा वाटा असल्याचे सोमनाथ अभिमानाने सांगतो.