जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत पीएमपीएमएल ची बससेवा सुरू करावी; नोकरदार व विद्यार्थ्यांचे दिलीप वळसे पाटलांकडे साकडे

1 min read

जुन्नर दि. २०:- जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग यांच्या सोयीसाठी भोसरी ते जुन्नर शिवनेरी, भोसरी, मंचर, अवसरी कॉलेज मार्गे भीमाशंकर साखर कारखानापर्यंत पीएमपीएमएलची बस सेवा सुरू करावी, अशी मागणी आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यातील नोकरदार व विद्यार्थ्यांनी केली आहे. याबाबत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ यांना निवेदन दिले आहे.मंचर, घोडेगाव, कळंब, पेठ, म्हाळुंगे, पिंपळगाव, लांडेवाडी आदी गावातून दररोज चाकण, रांजणगाव, म्हाळुंगे कारेगाव एमआयडीसी मध्ये सुशिक्षित तरुण नोकरी, उद्योग व व्यवसायासाठी रोज ये- जा करत असतात. तसेच पूर्व भागातील निरगुडसर, पारगाव, अवसरी बुद्रुक येथील विद्यार्थी मंचर, अवसरी कॉलेजला ये-जा करणारी मुले त्याचप्रमाणे खेड, चाकण, मंचर, नारायणगाव, चाकण, रांजणगाव म्हाळुंगे एमआयडीसीमध्ये उद्योग व्यवसाय नोकरी निमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी पुणे, भोसरी, मोशी, चाकण, खेड परिसरातून विद्यार्थी दररोज ये-जा करत आहे. एसटी बसच्या अपुऱ्या फेऱ्या त्या पण वेळेत नसल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्गाला खाजगी वाहनातून जीव गेला प्रवास करावा लागत आहे. याबाबत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ यांना सूचना करावी, अशी मागणी नोकरदार वर्ग, प्रवासी, विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे