तंबाखूची तलब बेतली जिवावर; तंबाखूसाठी मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
1 min read
नारायणगाव दि.१७:- जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी येथे तंबाखू दिली नाही म्हणून शिवीगाळ केल्याने मित्राने मित्राच्याच डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केला. जखमीला बेशुद्ध अवस्थेत येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले आहे.याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. जुन्नर न्यायालयाने आरोपीला पाच दिवसाची पोलिस कोठडी दिली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सुनील धनवे यांनी दिली. महेश विजय क्षीरसागर (वय २७, रा. वारूळवाडी ता. जुन्नर) याच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी राजेश देवराम काळे (रा. वारूळवाडी ता. जुन्नर) याला अटक करण्यात आली आहे.
पंधरा वर्षांपूर्वी महेश क्षीरसागर याच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. तेव्हापासून तो वारुळवाडी येथील सागर रमेश पवार यांच्या घरी राहत आहे. महेश व राजेश
हे मित्र आहेत. रोज रात्री ते एकमेकाला भेटत असे. शुक्रवारी रात्री महेश व राजेश याच्या घरी गेला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास महेश व राजेश यांच्यात तंबाखूच्या कारणावरून वाद झाला. तंबाखू न दिल्याने महेश याने राजेशला शिवीगाळ गेली. रोज तंबाखू फुकट खातो याचा राग राजेश याच्या मनात होता. शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या राजेश याने महेश याच्या डोक्यात दगड घातला. रक्तस्त्राव होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महेश क्षीरसागर बेशुद्ध पडला.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेले सागर पवार, लखन रमेश परदेशी, गणेश कांबळे यांनी रुग्णवाहिका बोलावून महेश क्षीरसागर याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. महेश क्षीरसागर अत्यवस्थ आहे. पुढील तपास फौजदार जयदेव पाटील करत आहेत.