ॲपल कंपनीच्या बनावट ॲक्सेसरीज विकणाऱ्यांवर कारवाई
1 min read
नगर दि.१६:- नगर मध्ये ॲपल कंपनीचे बनावट ॲक्सेसरीज विकणाऱ्या सहा दुकानांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार दि.१४ रोजी छापे टाकले. यात सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पथकाने जेरबंद आरोपींकडून तब्बल ३७ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर दोन आरोपी पसार आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, जी.आय.पी.एस.प्रा.लि. या कंपनीचे मुख्य तपासी अधिकारी कुंदन बेलोशे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना समक्ष भेटून नगर शहरातील वाडिया पार्क येथील मोबाईल दुकानामध्ये ॲपल कंपनीच्या नावाचा वापर करुन ॲपल कंपनीचा लोगो असलेली बनावट ऍ़क्सेसरी विक्री होत असलेबाबत माहिती दिली.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणी कारवाईचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तयार करुन जी. आय. पी. एस. प्रा. लि. कंपनीचे अधिकारी व पंचांना सोबत घेवून वाडिया पार्क कॉम्प्लेक्समध्ये जावून खात्री करुन कारवाई केली.