आचारसंहिता म्हणजे काय? त्याचे नियम कोणते असतात? वाचा सोप्या भाषेत

1 min read

पुणे दि.१७:- निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासूनच आदर्श आचारसंहिता लागू होते आणि निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहते. विशेष म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक उपक्रमांवर आणि कामांवर बंदी घातली जाते. तसेच, आचारसंहिता भंग केल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागते.*आचारसंहिता काळात ‘या’ कामांवर बंदी…* आचारसंहिता काळात सरकार धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही, कोणत्याही योजनेचे उद्घाटन किंवा अंमलबजावणी आचारसंहिता काळात करता येणार नाही, सरकारी कर्मचाऱ्यांची बदली व पदोन्नतीचे आदेश देखील आचारसंहिता काळात काढता येत नाही. निवडणुकीच्या प्रचारात सरकारी वाहन, कर्मचारी यांचा वापर करण्यास आचारसंहिता काळात मनाई असते, आचारसंहिता काळात धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर करता येत नाही, निवडणुकीच्या प्रचार करतांना सभा, रॅलीसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते, आचारसंहिता काळात परवानगीशिवाय घर, दुकान, जमीन किंवा आवारात बॅनर व पोस्टर्स लावता येणार नाहीत.*प्रचारात मुलांचा वापर करण्यास मनाई…*
5 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये, असा सल्ला दिला आहे. ज्यात म्हटले आहे की, “राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी प्रचारादरम्यान मुलांना आपल्या मांडीवर घेऊ नये, त्यांना वाहनांमध्ये बसवू नये किंवा रॅलीत सहभागी करून घेऊ नयेत. निवडणूक आयोगाने मुलांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोस्टर्स आणि पॅम्प्लेट वाटप करण्यास, घोषणाबाजी करण्याचे कामे देऊ नयेत असेही सांगितले आहे. *राजकीय पक्षाचे होर्डिंग काढावे लागतील….*
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच राज्यात आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे राजकीय पक्षाकडून सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग तात्काळ काढून घ्यावे लागते. आचारसंहिता जाहीर झाल्यावर प्रशासनाची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला होर्डिंग लावता येत नाही. अन्यथा आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल होतो.*रात्री 10 नंतर सभा घेण्यास मनाई…*
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, “सकाळी 6.00 च्या आधी आणि रात्री 10.00 नंतर सार्वजनिक सभा घेता येणार नाहीत. याव्यतिरिक्त, मतदान बंद होण्यासाठी निश्चित केलेल्या 48 तासांच्या कालावधीत उमेदवार सार्वजनिक सभा आणि मिरवणुका घेऊ शकत नाहीत.”*1) आचारसंहिता केव्हा पासून लागू होते?*
निवडणूक आयोग कोणत्याही निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी सुरुवातीला एक पत्रकार परिषद घेते. त्यावेळी या तारखा जाहीर करतानाच तात्काळ परिणामाने आदर्श आचारसंहिता लागू होते, ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत
लागू च राहते.

*2) आचारसंहिता कोणत्या भागात लागू करण्यात येते?
संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी आचारसंहिता लागू असते परंतु विधानसभा निवडणुकीच्या वेळी फक्त त्या त्या राज्यांमध्येच आचारसंहिता लागू असते. तर पोटनिवडणुकी वेळी आचारसंहिता संबंधित मतदारांच्या परिसरात लागू असते.3) पहिल्यांदा आचारसंहिता कुठे लागू करण्यात आली होती? 1960 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीवेळी पहिली आचारसंहिता लागू करण्यात आली होती. त्यानंतर 1962 साली लोकसभेच्या निवडणुकीवेळी देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली.4) आचारसंहिता कोणत्या कायद्यांतर्गत लागू असते?*
आदर्श आचारसंहिता कोणत्याही कायद्याचा आधार घेत नाही. ही आचारसंहिता सर्व राजकीय पक्षांचे मत आणि तज्ञांचे मत घेऊन लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यामध्ये वेळोवेळी बदलही करण्यात येत आहे.5) आचारसंहितेची वैशिष्ट्ये कोणती? आचारसंहितेमध्ये राजकीय पक्षांसाठी उमेदवारांसाठी काही महत्त्वाचे नियम आखून दिले आहेत. प्रामुख्याने राजकीय पक्ष, उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी सभा प्रचार निवडणुका मिरवणुका यांचे नियोजन कसे करावे याबाबतची नियमावली आचारसंहिते देण्यात आली आहे. तसेच या काळामध्ये कशा पद्धतीने वागायला हवे हे देखील सांगण्यात आले आहे.6) आचार संहितेत पक्ष आणि उमेदवारांसाठी कोणते नियम आहेत?समाजामध्ये द्वेष पसरवू नये, वाद होईल असे कोणतेही वक्तव्य करू नये, जाती आणि समुदायांमध्ये धार्मिक किंवा भाषिक तेढ निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये, हिंसक किंवा एखाद्या समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य करू नये.7) आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कोणती कारवाई होते?एखाद्या पक्षाने किंवा उमेदवाराने आचारसंहितेचे नियम पाळले नाहीत तर निवडणूक आयोग त्यांच्यावर कठोर कारवाई करते. यावेळी संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून थांबवले जाते. गरज असल्यास फौजदारी खटलाही दाखल केला जातो. अधिक नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवासाची ही शिक्षा होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे