पाण्याच्या शोधात आणे येथे हरणाचा विहिरीत पडून मृत्यू

आणे दि.१४ : आणे (ता. जुन्नर) येथे पठारी भाग असल्याने पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. हरीण पाण्याच्या शोधात आहेर वस्तीवरील बाजीराव सखाराम आहेर या शेतकऱ्याच्या विहिरीत एक हरीण मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. सायंकाळी पाचच्या सुमारास बाजीराव आहेर हे विहिरीवर पिण्याच्या पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना हरीण मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना दिसले. ही बाब त्यांनी वस्तीवर सांगितल्यानंतर धनंजय (बंटी) आहेर यांनी दूरध्वनीवरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीचा फास टाकून मृत हरीण पाण्याबाहेर काढले व वन परिमंडळ कार्यालय बेल्हे या ठिकाणी घेऊन गेले. त्या ठिकाणी वनपाल नीलम ढोबळे व राजेंद्र गाढवे यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी दिपक बेल्हेकर यांनी त्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर त्याचे दहन करण्यात आले.
अशी माहिती वन कर्मचारी जे. डी. भंडलकर यांनी दिली. हे हरीण चिंकारा जातीचे असून साधारण एक ते दीड वर्षे वयाचे मादी हरीण होते. हे हरीण विहिरीतून बाहेर काढण्यासाठी आहेर वस्तीवरील संजय आहेर, स्वप्नील आहेर, चैतन्य आहेर, रोहित आहेर, किरण आहेर, कृष्णा आहेर आदी तरुणांनी सहकार्य केले.