बेल्ह्यात उद्घाटनाचा बॅनर अज्ञाताने फाडला

1 min read

बेल्हे दि.१३- बेल्हे (ता.जुन्नर) येथील पिंगट आळीतील पोळेश्वर चौक ते बेल्हेश्वर मंदिरापर्यंत काँक्रिटीकरणाचा उद्घाटनाचा बॅनर अज्ञात व्यक्तीकडून फाडून नुकसान केल्याची घटना सोमवारी रात्री घडली असून विकास कामांना विरोध करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा निषेध बेल्हे शिवसेना शाखेकडून करण्यात आला आहे.

याविषयीची अधिक माहिती अशी की, बेल्हे येथील कोळेश्वर चौक ते बेल्हेश्वर मंदिराच्या काँक्रिटीकरणासाठी माजी उपसरपंच निलेश कणसे, प्रदीप पिंगट, मोहन मटाले, बबन औटी यांनी आपापले पक्ष बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व शिवजन्मभूमी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्याकडे या कामासाठी पाठपुरावा केला

असता त्यांनीही त्यांना योग्य तो प्रतिसाद देऊन जवळपास ४० लक्ष रुपयांचा निधी त्यासाठी उपलब्ध करून दिला व सोमवार (दि.११) रोजी सकाळी दहा वाजता शरद सोनवणे व बेल्हे गावातील लोकनियुक्त सरपंच मनिषा डावखर, उपसरपंच राजेंद्र पिंगट, सर्व सदस्य व गावातील इतरही अनेक मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी या ठिकाणी उद्घाटनाचा एक बॅनरही लावण्यात आला होता, त्या बॅनरचे अज्ञात व्यक्तीने सोमवारी रात्री फाडून नुकसान केल्याची घटना घडली असल्याने गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे जाणवते.

याविषयी बोलताना बेल्हे गावचे माजी उपसरपंच निलेश कणसे यांनी असे मत व्यक्त केले की, काही अज्ञात समाजकंटकांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा बॅनर फाडून आपल्या संकुचित व मनोरुग्ण मनोवृत्तीचे दर्शन घडविले असून, तुमचा विकास कामांना विरोध असल्याचे यातून जाणवते,

तसेच गावचा होणारा विकास हा तुमच्या डोळ्यात खूपत असल्याचे जाणवत आहे आणि अशाप्रकारे बॅनर फाडून व नासधूस करून गावातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि गावातील विविध राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असा इशारा दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे