जागतिक महिला दिनानिमित्त राजुरी येथे २१६ महिला सेवेकऱ्यांनी केले भैरवचंडी पाठाचे पारायण

1 min read

बेल्हे दि.१२:- श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) राजुरी आयोजित जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.सकाळी ८ वा. भूपाळी आरतीने या सोहळ्यास सुरुवात झाली. साडेदहाच्या आरतीनंतर भैरव चंडी पाठ संकल्प सोडण्यात आला. उपस्थित सेवेकऱ्यांना सेवाकेंद्रातील प्रतिनिधीकडून मार्गदर्शन करण्यात आले.

त्यानंतर राजुरी,उंचखडक,बेल्हे,बोरी,निमगाव सावा,सुलतानपूर,शिरोली,पिंपळवंडी आणि वडगाव आनंद या ठिकाणाहून सुमारे २१६ सेवेकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये सामुदायिक हवनयुक्त भैरव चंडी पाठ पारायण संपन्न झाले.केंद्रातील प्रतिनिधिंनी स्वामी मार्गाविषयी व १८ विभागाचे मार्गदर्शन केले व बालसंस्कार वर्गाबद्दल माहिती दिली.

स्वामी सेवा केंद्राच्या वतीने महिलांसाठी नियमितपणे विविध कार्यक्रम राबवले जातात.त्यामध्ये महिला सक्षमीकरण,जागर आरोग्याचा,जागर स्त्री शक्तीचा तसेच महिलांविषयी अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्यपूर्ण आयोजन केले जाते.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी आयुर्वेदाचार्य डॉ.सुप्रिया कुऱ्हाडे उपस्थित होत्या.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ.सुप्रिया कुऱ्हाडे म्हणाल्या की,महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आज खूप महत्त्वाचे आहे.स्त्रियांचे मानसिक आरोग्य, जननसंस्थेचे आजार व कॅन्सर आणि मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास आदीबाबत महिलांनी आरोग्यविषयक उपक्रम जागरुकपणे राबविल्यास अनेक महिला आपला जीव,प्राण वाचवू शकतात.नाश्त्यामध्ये बाहेरून आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या एखादा धान्याचा पदार्थ खाणे कधीही चांगले.दुपारच्या जेवणामध्ये भात,वरण,भाकरीसोबत हिरव्या पालेभाज्या,डाळी उसळी,ताक,दही अशा पदार्थांचा समावेश करावा.संध्याकाळी चिप्स,चिवडा या गोष्टीपेक्षा सुकामेवा,फळे,लाह्या,गुळशेंगदाणे,फुटाणे अशा पदार्थांचे सेवन करावे.रात्रीचा आहार शक्यतो हलका असावा.त्यामधे तळलेले पदार्थ,गोड पदार्थ,खाणे टाळावे.अंगावर दुखणे काढल्याने समस्या अजून जटिल होत जातात.पुरेसा व्यायाम करावा,चालणे,योग करणे इत्यादी व्यायाम प्रकार करावेत.त्यामुळे वाढते वजन नियंत्रणात येते. सांध्यांचा त्रास,गुडघेदुखी,श्वसनाचे विकार बरे होतात. वाढते शुगर,कोलेस्ट्रॉल,गर्भाशयाच्या तक्रारी इत्यादी योगामुळे नियंत्रण मिळवता येते.आरोग्य हिच खरी धनसंपदा असून आपला आहार हेचं आपले इंधन आहे हे ध्यानात घेऊन प्रत्येक स्त्रीने आजाराविषयी काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी डॉ.सुप्रिया कुऱ्हाडे यांनी केले.सर्व सेवेकऱ्यांसाठी केंद्राच्या वतीने आमटी भाकरीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते.यावेळी माजी जिल्हा परिषद स्नेहल शेळके,सरपंच प्रिया हाडवळे,उंचखडक गावच्या विद्यमान सरपंच सुवर्णा कणसे,राजुरी ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया औटी,रूपाली औटी,हिरकणी सेवा बचत गटाच्या अध्यक्षा हेमलता शिंदे,शिवाई ग्रामसभा बचत गटाच्या अध्यक्षा संगीता शेळके त्याचप्रमाणे राजुरी व राजुरी परिसरातील महिला सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या सोहळ्याचे नियोजन उत्तर पुणे जिल्हा प्रतिनिधी सारिका शेळके,केंद्र प्रतिनिधी नारायण वाळुंज तसेच पंच कमिटीतील सर्व सदस्य आणि कार्यरत सेवेकरी यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर शिंदे यांनी तर आभार उत्तर पुणे जिल्हा प्रतिनिधी सारिका शेळके यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे