प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन संपन्न
1 min read
पुणे दि.११:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार दि.१० दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आलेल्या पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास पुणे विमानतळ येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सहभागी झाले.
या नव्या टर्मिनलमुळे देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. पुणे शहराला साजेसे भव्य आणि आधुनिक, पुणे शहराच्या संस्कृतीची अनुभूती करून देणारे विमानतळ टर्मिनल अस्तित्वात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले.
महाराष्ट्रातही विमानतळाच्या धावपट्यांना विकसित करून विमानतळांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. असे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुणे विमानतळ टर्मिनलची ९० लाख वार्षिक प्रवासी क्षमता आहे. ३४ चेक इन काऊंटर व एक हजार मोटारी उभ्या राहू शकतील एवढी जागा आहे.
पुणे जिल्ह्यात नवे विमानतळ उभारण्यासोबत विद्यमान धावपट्टी वाढविण्याचा विचार करण्यात येत आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.