आजपासून दहावीची परीक्षा; १६ लाख परीक्षार्थी; ५ हजार परीक्षा केंद्र
1 min read
पुणे, दि.१:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवार (दि.१) पासून सुरुवात होणार आहे.
या परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधील १६ लाख ९ हजार ४४५ विद्याथ्यांची नोंदणी झालेली आहे. परीक्षेसाठी ५ हजार ८६ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नऊ विभागीय मंडळांमार्फत लेखी परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ८ लाख ५९ हजार ४७८ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार १११ विद्यार्थिनी आहेत व ५६ ट्रान्सजेंडर आहेत. मागील वर्षी झालेल्या परीक्षेसाठी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
यंदा त्यात ३२ हजार १८९ एवढ्या विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. या १७ नंबर फॉर्म भरलेले ६ हजार ७७, रिपीटर ८ हजार १५६ तर नियमित १७ हजार ८५६ याप्रमाणे विद्यार्थीसंख्येत वाढ झालेली आहे. राज्य मंडळाच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागला आहे.
आरटीई अंतर्गत खासगी विना अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित शाळांमध्ये पुढील शिक्षणासाठी फी भरणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. यामुळे या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढली आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.