विकास चव्हाण छत्रपती शिवाजी महाराज यशप्राप्ती २०२४ पुरस्काराने सन्मानित
1 min read
पारगाव तर्फे आळे दि.२८:- पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथील विकास हरिभाऊ चव्हाण यांना नुकताच पीपल्स आर्ट सेंटर मुंबई यांचा तेरावा छत्रपती शिवाजी महाराज यशप्राप्ती २०२४ या पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून Adv डॉ.प्रकाश कुमार राहुले सेवानिवृत्त न्यायाधीश मुंबई,डॉ.भगवान कापसे NIPHT, महा केसर आंबा बागायतदार संघ उपाध्यक्ष पीपल्स आर्ट सेंटरचे सचिव गोपकुमार पिल्ले,नवी मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
या पुरस्कारामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशपातळीवरील एकूण २४ मान्यवरांचा समावेश होता. यामध्ये चव्हाण यांनी ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन चळवळ उभी करत विघ्नहर साखर कारखान्याच्या माध्यमातून हजारो एकर कार्यक्षेत्रावर पाचट व्यवस्थापन केले आहे.
पाचट न पेटविल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग चे संकट कशा प्रकारे टळू शकते, कमी खर्चात ऊसाची सुपर केन नर्सरी कशा प्रकारे तयार करावयाची, त्याच बरोबर ऊस शेतीचे पाणी व्यवस्थापन आणि ऊस पिकाची उत्पादन वाढ यावर अभ्यास करत शेतकऱ्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे कमी खर्चात झालेली योग्य उत्पादन वाढ आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हजारो नर्सरी बनविण्याचे काम चव्हाण यांनी केले.
असून या सामाजिक दायित्वाचे कार्य करण्याच्या पार्श्वभूमीवर या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. विकास यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, जुन्नर चे आमदार अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, पारनेरचे आमदार निलेश लंके आणि सर्व स्तरातून विकास यांचे अभिनंदन कौतुक होत आहे.
विकास चव्हाण यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत ४८ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे चार पुरस्कार,संशोधन संस्था,कारखाना,झी युवा वाहिनी,सामाजिक व अन्य पुरस्कारांचा समावेश आहे.
यावेळी विकासचे वडील हरिभाऊ चव्हाण आई कलावती चव्हाण आणि संपूर्ण चव्हाण परिवार, बाळासाहेब तट्टू सहाय्यक संचालक मंत्रालय मुंबई, मंगरूळ गावच्या लोकनियुक्त सरपंच तारा लामखडे, दत्तात्रय कोरडे, सप्निल डुकरे,राजू मणियार उपस्थित होते.