नगर जिल्ह्यात पाणी टंचाई; संभाव्य टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहा : राधाकृष्ण विखे पाटील
1 min readनगर दि.२३:- पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात नगर जिल्ह्यातील संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहा, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात टंचाईच्या परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित हाेते.
विखे पाटील म्हणाले, ”संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीमध्ये टंचाई असलेल्या गावातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळावे, यासाठी पाणी वितरणाचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावे. पाणी वाटपावेळी गावामध्ये तलाठी व ग्रामसेवकांनी उपस्थित राहून प्रत्येक नागरिकाला पाणी मिळेल, यादृष्टीने कार्यवाही करावी.”