शेळी की मांजर? संगमनेरी शेळीने दिला चक्क पाच करडांना जन्म

1 min read

संगमनेर दि.९ :- ‘ऐकावं ते नवलच ‘ संगमनेर येथे शेळीने एकाच वेळी पाच करडांना जन्म दिल्याची घटना घडली असून याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्पात हे घडले आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्पातील शेळीने तब्बल पाच करडांना जन्म दिला आहे. हिवरगाव पावसा येथील शेतकरी अनिल दशरथ गोफणे यांच्या कळपातील ही शेळी आहे.

पांढऱ्या शुभ्र शेळीने पांढरीच सुदृढ पिल्ले जन्माला घातली आहेत. साधारणपणे ७५ टक्के शेळ्यांना एक ते दोन करडे होतात. चार टक्के शेळ्या तीन करडे देतात. त्यापेक्षा जास्त करडे अपवादानेच दिली जातात. गोफणे यांच्या कळपातील शेळी अशीच अपवाद ठरली आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात अखिल भारतीय समन्वित शेळी सुधार प्रकल्पाद्वारे संगमनेरी शेळ्यांचे जतन, संवर्धन व गुणवत्ता वाढीसाठी जातिवंत संगमनेरी बोकड शेळी पालकांना पैदासीसाठी दिले जातात.

याअंतर्गत संगमनेर केंद्रातील हिवरगाव पावसा येथील शेतकरी अनिल दशरथ गोफणे यांच्या संगमनेरी शेळ्यांच्या कळपातील दोन शेळ्यांना प्रत्येकी चार करडे आणि एका शेळीने पाच करडे देण्याचा विक्रम केला आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली.

कुलगुरु डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाने भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सहाय्याने नामशेष होत असलेल्या संगमनेरी जातीच्या शेळ्यांची संख्या तीन हजारांवरून ५० हजारपर्यंत नेण्यात यश मिळविले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे