गुळुंचवाडी येथे शिवजयंती उत्सवानिमित्त ‘कलाविष्कार चिमुकल्यांचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

1 min read

गुळुंचवाडी दि.२२:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथे शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन 2024 अर्थात ‘कलाविष्कार चिमुकल्यांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन. विद्यार्थ्यांमधील उपजत सुप्त क्षमतांची जाणीव व्हावी , त्यांच्यातील कलागुणांचा वाव मिळावा या उद्देशाने वार्षिक स्नेहसंमेलनाचे सालाबादप्रमाणे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये गुळुंच वाडी व गणेश नगर जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी मधील सुमारे 160 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध प्रकारचे नृत्य अविष्कार सादर केले.

सर्वप्रथम छत्रपतींच्या प्रतिमेचे व विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक वेशभूषा केली होती. छत्रपती व मावळ्यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा, लेझीम पथकाने ढोल ताशावर धरलेला ठेका मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. या मिरवणुकीत गावातील शेकडो शिवभक्तांनी सहभाग घेतला. यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी करण्यात आली.

यानंतर शिवरायांच्या अर्धपुतळ्याचे, सरस्वतीचे व रंगमंचाचे पूजन करून स्नेहसंमेलनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम शिवरायांची आरती अंजनाबाई बंडू देवकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ भांबेरे यांच्या हस्ते घेण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता कुऱ्हाडे यांनी केले. नेत्रादीपक लायटिंग, उत्तम स्पीकरव्यवस्था, बॅनर व डेकोरेशन करून रंगमंच सजवण्यात आला होता.तदनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी गणेश वंदना करून स्नेहसंमेलनाचा श्री गणेशा केला.

विद्यार्थ्यांनी शिवरायांचा पोवाडा, भक्ती गीते, शेतकरी नृत्य, महाराष्ट्राची लोककला असणाऱ्या लावण्या, आदिवासी नृत्य, कोळीगीते, समाज प्रबोधन पर किर्तन, फ्युजन गीत असे विविध बहारदार व मनमोहक नृत्याविष्कार सादर केले.

चिमुकल्यांच्या प्रत्येक नृत्याला उपस्थित रसिकप्रेक्षकांनी दाद दिली व मोठया प्रमाणावर बक्षीसांचा वर्षाव केला. या कार्यक्रमास जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे, माजी अध्यक्ष विकास मटाले, जुन्नर तालुका प्राथमिक पतसंस्थेचे सभापती संतोष पाडेकर, तेजेवाडी शाळेचे मुख्याध्यापक दौलत बांगर,

शिक्षक पतसंस्थेचे सचिव नानाभाऊ कणसे, जुन्नर तालुका पतसंस्थेचे संचालक रवींद्र वाजगे, अंबादास वामन,तज्ञ संचालक सुभाष दाते, संघ शिलेदार गणेश कवडे, महेश साबळे, नळवणे शाळेचे मुख्याध्यापक रामदास संभेराव, शिंदेवाडी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर पंडित आदींनी भेट देऊन बालकलाकारांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी गुळूंचवाडी, विठ्ठलवाडी व गणेशनगर मधील सुमारे आठशे ते नऊशे महिला,पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुळूंचवाडीच्या माजी सरपंच वैशाली गुंजाळ यांच्या सौजन्याने करण्यात आले होते.

प्राची दगडूभाऊ काळे व सगुनाबाई गंगाधर गुंजाळ या भाग्यवान महिला लकी ड्रॉ द्वारे आकर्षक पैठणीच्या मानकरी ठरल्या. गावातील ज्येष्ठ नागरिक अंजनाबाई बंडू देवकर यांच्या हस्ते या भाग्यवान महिलांना पैठणी बक्षीस देण्यात आल्या. स्नेहसंमेलनास उपस्थित पालक ग्रामस्थ, शिक्षक या सर्वांनी सर्व कलाकारांचे कौतुक करून सुमारे 55 हजार रुपयांचे बक्षीस व देणग्या दिल्या.

कार्यक्रम समाप्तीनंतर आदिमाया सेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्री जालिंदर शेठ देवकर यांच्या वतीने सर्व बालकलाकारांसाठी तसेच प्रेक्षकांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.चिमुकल्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गुळुंचवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच अतुल भांबेरे,

उपसरपंच शांताराम गुंजाळ तसेच त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ भांबेरे,उपाध्यक्ष चंचल गुंजाळ तसेच त्यांचे सर्व सदस्य, विविध संस्थांचे सर्व आजी-माजी पदाधिकारी,तरुण वर्ग, महिला भगिनी, माजी विद्यार्थी, छत्रपती पुरुष बचत गटातील सर्व सदस्य उपस्थित होते.

आणे केंद्राच्या केंद्रप्रमुख व गुळुंचवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे यांच्या नियोजनाने व मार्गदर्शनाखाली शाळेतील सरिता मटाले, ज्योती फापाळे, नुरजहाँ पटेल, मैत्रेयी परबत, अशोक बांगर, ज्ञानेश्वर जाधव, विजय चव्हाण यांनी उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. ज्ञानेश्वर जाधव यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले तर विजय चव्हाण यांनी उपस्थित सर्वांचे कार्यक्रमात सहभाग घेऊन सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे