नाशिक – पुणे हायस्पीड रेल्वे सुसाट; नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी अर्थसंकल्पात अडीच हजार कोटींची तरतूद

1 min read

पुणे दि.३:- नाशिक – पुणे रेल्वेचा मार्ग मोकळा झाला असून अर्थसंकल्पात नाशिक आणि पुणेकरांना खुशखबर असून तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती खासदार डॉ.अमोल कोल्हे व खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. त्यामुळे लोहमार्ग उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे.

नाशिक – पुणे प्रस्तावित लोहमार्गासाठी केवळ चर्चाच सुरू होती. कधी या कामाला गती तर कधी फायलींचा प्रवास थांबत होता. या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे. नाशिक -पुणे -मुंबई हा विकासाचा सुवर्ण त्रिकोण आहे. मध्यंतरी नाशिकहून कल्याण आणि तेथून पुणे असा मार्ग पार करावा लागत होता.

मात्र हा प्रवासही आता थांबला आहे, नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला. खासदार डॉ.अमोल कोल्हे व खासदार हेमंत गोडसे यांनीही संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर या लोहमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

प्रस्तावित नाशिक- पुणे लोहमार्गास राज्य आणि केंद्र शासनाने यापूर्वीच मान्यता दिलेली आहे. या प्रकल्पासाठी १७ हजार ८८९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून राज्य आणि केंद्र प्रत्येकी २० टक्के तर इक्विलिटीमधून ६० टक्के निधी उपलब्ध होणार आहे.


वेळेची होणार बचत :- नाशिक -पुणे रेल्वे लाइनमुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार असून रस्ता अपघाताच्या तुलनेने अपघातात मोठी घट होणार आहे. उत्सर्जनाचा खर्च अत्यंत कमी होणार आहे. इंधनाची मोठी बचत होणार असून रोजगाराला चालना मिळणार आहे.

कोच दुरुस्ती कारखान्यासाठी १९ कोटी नाशिक येथील रेल्वे ट्रॅक्शन परिसरात कोच दुरुस्ती आणि मेटेनन्सचा
कारखाना उभारणीसाठी रेल्वे बोडनि ४५ कोटी रुपयांच्या निधीला तत्त्वतः मान्यता दिली होती. रेल्वे बोडनि सादर केलेल्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात कोच दुरुस्ती कारखाना उभारणीच्या कामासाठी १८ कोटी ८५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे.

या बरोबरच ट्रेन्शन परिसरात उभारण्यात येत असलेल्या व्हील रिपेअरिग कारखान्यासाठीही तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमुळे या दोनही प्रकल्पांचे काम वेगाने होणार असून रोजगार निर्मितीस मोठी चालना मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे