सुपा बाजारात मोबाईल चोरणाऱ्या दोघांना पकडले; दोघांवर गुन्हा दाखल
1 min readपारनेर दि.१:- पारनेर तालुक्यातील सुमारे २० ते २२ गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायंकाळी कंपनीचे कामगार सुटल्यानंतर बाजारात मोठी गर्दी होते.
याचाच फायदा उचलत चोरटे मोबाईलवर हात साफ करण्यात यशस्वी होत आहेत. मात्र बुधवारी (ता.३१) सायंकाळी असेच दोन भामटे नागरिकांच्या सतर्कतेमुळे जाळ्यात अडकले. या दोघांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.
सुपा येथील औद्योगिक वसाहतीमधील कामगार सुटल्यानंतर सायंकाळी ६:३० वाजता बापू बाजीराव झांबरे (वय ४५ , रा. दैठणे गुंजाळ ता. पारनेर) हे बाजार करत असताना गर्दीचा फायदा घेऊन दोघा जणांनी झांबरे यांच्या खिशातून मोबाईल काढून घेतला व तेथून पळ काढला.
बाजारात असलेल्या नागरिकांनी या दोघांचा पाठलाग करून त्यांना पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. सुपा पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या अभिषेक अशोक जोगारे (वय २९), करण शिवाजी वाघमारे (वय १६, दोघे रा. राजीवनगर, जि. बीड) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विवो कंपनी असलेला ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. बापू झांबरे यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.