सहाय्यक पोलीस निरीक्षकास २ लाख रुपयांची लाच घेताना अटक
1 min readभिवंडी दि.३१:- शहरातील नारपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना दोन लाख रुपयांची – लाच स्वीकारताना नारपोली पोलीस ठाण्यातच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की, २५ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह गाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे ७ डिसेंबर रोजी उघड झाले होते. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दाखल केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आयुश वीरेंद्र झा, मनोज नारायण टोपे, अनिकेत तुकाराम खरात, शिवाजी धनराज माने, संतोष सत्यनारायण ताटीपामूल या आरोपींना अटक करून या गुन्ह्याचा तपास सपोनि शरद पवार हे करत होते. आरोपी अनिकेत खरात याचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी पवार यांनी अनिकेतच्या आईकडे ५ लाखांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड होऊन अनिकेतच्या आईने २ लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर महिलेने त्याची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नारपोली पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी केलेल्या कारवाईत पवार यांना रंगेहाथ पकडले.