जुन्नर तालुका विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी व विज्ञानप्रेमींचा उदंड प्रतिसाद; ४४१ प्रकल्पांची नोंद
1 min read
बेल्हे दि.२:- पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) व जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ आणि समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे (बांगरवाडी) यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन व मेळावा सन २०२३-२४ समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे संपन्न झाले.या प्रदर्शनाचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले.यावेळी बालभारती चे माजी विशेषाधिकारी डॉ.अजयकुमार लोळगे, युवा शास्त्रज्ञ डॉ. प्रतीक मुणगेकर, संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके.
माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, प्राचार्या वैशाली आहेर, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघांचे अध्यक्ष रतिलाल बाबेल, गणित अध्यापक संघांचे अध्यक्ष प्रविण ताजने, मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष तबाजी वागदरे, सचिव अशोक काकडे, एच पी नरसुडे, तानाजी वामन, सतिश सगर, सुनील रोकडे, आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.मनोहर चासकर म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी आपल्या मधील कमतरता शोधून काढाव्यात व ज्ञानग्रहण करावे. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञानाची तहान, कष्ट घेण्याची क्षमता, एकाग्रता, अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टीबाबतची दृष्टी, कन्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करण्याची तयारी ठेवली तर यशस्वी होणारच असेल सांगितले.
बालभारतीचे माजी विशेषाधिकारी डॉ.अजयकुमार लोळगे म्हणाले की श्रुती स्मृती आणि कृती या तीन टप्प्यातून विद्यार्थी गेल्यास यश हे नक्कीच मिळते.आज दिवसभरामध्ये प्रदर्शन पाहण्यासाठी जुन्नर तालुक्यातील शाळा व महाविद्यालयातून तीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली.
प्रकल्प स्पर्धेसोबतच वक्तृत्व स्पर्धा, भित्तिपत्रक स्पर्धा,संगणकीय सादरीकरण स्पर्धा,कौन बनेगा विज्ञानपती, समर्थ आय टी आय विद्यार्थी निर्मित टाकाऊ पासून उपयुक्त वस्तू निर्मिती प्रदर्शन या स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
आयुकामार्फत विज्ञान वाहिनी,अगस्त्या फाउंडेशन मार्फत विज्ञान खेळणी प्रात्यक्षिक आदि कार्यक्रम पाहण्यासाठी देखील विद्यार्थ्यांनी भरपूर गर्दी केली होती.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण ४४१ प्रकल्प सहभागी झाल्याची माहिती विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशालीताई आहेर यांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी प्रास्ताविक प्रा.रतिलाल बाबेल यांनी तर आभार प्रा.एच पी नरसुडे यांनी मानले.