बेल्हे बाह्यवळणावर दुचाकी स्वाराचे अडीच लाख रुपयांचे दागिने लुटले
1 min readबेल्हे दि.२:- कल्याण – नगर महामार्गावर बेल्हे (ता.जुन्नर) येथील बाह्यवळणावर लुटण्याची घटना रविवार दि.३१ रोजी घडली आहे. याबाबत अज्ञात तीन व्यक्ती विरुद्ध आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, सानपाडा (मुंबई) येथे नोकरीस असलेले बेल्हे बांगरवाडीचे विशाल गोरक्षनाथ रोकडे हे त्यांच्या दुचाकीने आळेफाटा कडून नगरच्या दिशेने घरी जात होते.
बेल्हे गावच्या हद्दीत टेंभी नाकाजवळ एका अनोळखी वृद्ध व्यक्तीने त्यांच्याकडे लिप्ट मागितली, त्यांना दुचाकीवर घेतल्यानंतर अवघ्या पाचशे मीटर अंतरावर त्यांना उतरायचे म्हणाले,
दुचाकी थांबताच बांगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला तीन अज्ञात इसम यांनी मला पकडून माझे तोंड दाबून मला रस्त्याच्या कडेला आत मध्ये नेऊन माझ्या गळ्यातील सोन्याची चैन व
हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी असा दोन लाख पन्नास हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेऊन शेतातून डोंगराच्या दिशेने पळून गेले अशी फिर्याद दुचाकीस्वार विशाल गोरक्षनाथ रोकडे यांनी दिली.
आळेफाटा पोलीस ठाण्यात रोकडे यांनी फिर्याद दिल्यानंतर तीन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर करीत आहेत.