कोंबरवाडीत ऊसतोड मजुरावर बिबट्याचा हल्ला; प्रतीहल्यात मजूर गंभीर जखमी

1 min read

बेल्हे दि.२६:- जुन्नर तालुक्याच्या भागातील कोंबरवाडी येथे ऊस तोडणी कामगारावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्या हल्ल्याला प्रतिकार करताना २८ वर्षीय कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि.२६) सकाळी सात वाजता घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी, कोंबरवाडी बेल्हे (ता. जुन्नर) येथील शेतकरी शिवाजी तुकाराम गुंजाळ यांच्या शेतातील ऊस तोडण्यासाठी ऊस मजूर सकाळी आले होते. त्यांनी ऊस तोडण्यास सुरुवात केली असता उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने ऊस तोडणी मजूर सुरेश नामदेव माळी (वय २८, रा. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला पंजा मारुन उजव्या हाताला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यावेळी जखमी माळी यांनी बिबट्याचा प्रतिकार केला. सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे पाठवले असल्याची माहिती बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शिवाजी फड यांनी दिली.या भागात ऊस तोडणी सुरू असल्याने बिबटे सैरभैर झाल्याचे या घटनेवरून दिसून येते. ऊसतोडणी सुरू असल्याने बिबट्यांना लपन राहिली नाही. या मुळे या भागात भीतीच वातावरण पसरलं आहे.

मजुराची प्रकृती स्थिर असून नारायणगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऊसतोडणी सुरू असलेल्या ठिकाणी बिबट्याची पिल्ले आहेत का याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”

नीलम ढोबळे, वनपाल बेल्हे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे