रब्बी हंगामाला बदलत्या हवामानाचा फटका
1 min readबेल्हे दि.१९:- शेतकऱ्यांच्या मागे एकामागून एक संकट उभे राहत आहे. सुरुवातीला गारपीट, अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर आता ढगाळ वातावरण धुक्याने शेतकरी पुन्हा जेरीस आला आहे. कांदा, गहू, हरभरा आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव हाेण्याची शक्यता आहे.
सततच्या हवामान बदलामुळे यंदा रब्बी हंगामाला फटका बसत आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला. त्यात आता सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण असते. त्यामुळे कांद्यावर करपा, हरभऱ्यावर गाठी अळीचा प्रादुर्भाव हाेण्याची शक्यता आहे.
त्यामळे शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. रब्बी हंगामातील गहू, तूर व हरभरा पिकांवर विविध किडींनी हल्लाबोल केल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या किडींच्या बंदोबस्तासाठी पुन्हा शेतकऱ्यांना किटकनाशक फवारण्याची वेळ आली आहे.