बाजार भाव नसल्याने कांद्याच्या शेतात सोडल्या मेंढ्या
1 min readबोरी दि.१७:- कांद्याला योग्य असा बाजारभाव मिळत नसल्यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक मेटाकुटीला आले असुन कांद्याच्या विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे बोरी बुद्रूक येथील एका शेतक-याने दोन एकर कांद्याच्या शेतात मेंढ्या चरण्यासाठी सोडल्याची घटना समोर आली आहे.
जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील गावांमध्ये मोठया प्रमाणात कांदा लागवड केली जाते. शेतकऱ्यांच्या कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक अर्थसंकटात सापडला आहे. सध्या कांद्याला किलोला फक्त १५ ते २५ रुपये भाव मिळत आहे परंतु वातावरणात नेहमी होणारे बदल यामुळे वेळोवेळी करावी लागत असलेली औषधे फवारणी, खतांचे वाढलेल्या किंमती यासाठी मोठा खर्च येत असुन सध्या मिळत असलेल्या भावात खर्च देखील फिटत नाही.
“कांदा उत्पादन करण्यासाठी खर्च वाढलेले आहे.खते, औषधे यांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या असुन लागवडीपासुन काढणीपर्यंत मोठा खर्च येत असुन यामध्ये औषधे ,खते, मजुराचे दर देखील वाढलेले आहेत तसेच कांदा निर्यात थांबविल्यामुळे कांद्याचे दर कोसळले असल्याने शासनाने निर्यातबंदी उठवत कांदा उत्पादकाला रास्त भाव देण्यात यावा नाहीतर कांद्यालादेखील खर्चाच्या प्रमाणात हमीभाव द्यावा,”
संजय टेकुडे, कांदा उत्पादक शेतकरी
“शेतमालाचे भाव पाडायचे किंवा निर्यातबंदी करायची भाव पाडायचे शेतकरी दिवस रात्र कष्ट करतो मर मर मरतो बिबट्याची भिती वेगळीच यवढ सगळ करून माल बाजारात आला की भाव पाडायचे कांद्याला चार पाच वर्षे झाले भाव नाही आता जरा कोठे कांद्याला भाव मिळायला लागला चार पैसे जास्त मिळतील सरकारने लगेच निर्यातबंदी केली.
लाल कांदा जास्त दिवस टिकत नाही हि बंदी केल्यामुळे ५० ₹ गेलेला कांदा २० ₹ आला हा तोटा सरकार भरून देनार का? त्यातुन शेतकर्यांनी केलेला खर्च भरून येत नाही सरकारच धोरन काय शेतकर्यांना खड्यात घालने आहे का? माझे जुन्नर तालुक्यातील शेतकरी पुत्र आसनारे वकिलांना सांगने आहे की तुम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतिने हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करावी.”
शिवाजी डुंबरे, कांदा उत्पादक शेतकरी, बेल्हे