जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक मेटाकुटीला

1 min read

बेल्हे दि.१६:- शेतकऱ्यांनी ऐन दुष्काळामध्ये अतोनात कष्ट करून, प्रसंगी पाणी विकत घेऊन पिकवलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. तीन दिवसांत कांद्याच्या भावात किलोला ८ ते १० रुपयांची घट झाली.

घसरलेल्या कांद्याच्या दरामुळे शेतकरी अक्षरश हतबल झालेला आहे. कांद्याच्या विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जुन्नर तालुक्यातील सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते.

उत्पादन खर्च जाऊन हक्काचे दोन रूपये मिळतील, अशी त्यांची अपेक्षा असते पण तीसुद्धा आता फोल ठरतेय की, काय असेच आता वाटायला लागलय.

एकीकडे दुष्काळाची दाहकता वाढत असताना या भागातील शेतकऱ्यांच्या कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक अर्थसंकटात सापडला आहे. सद्य:स्थितीत पाण्याचे नियोजन करून प्रसंगी पाणी विकत घेऊन, बँकेचे कर्ज काढूनशिवाय श्रम करून उत्पादन केलेल्या व नशिबाने बऱ्यापैकी उत्पादन आलेल्या कांद्याला यंदा भावच नसल्याने त्यांची शेती पार तोट्यात आली आहे.

सध्या बाजारपेठेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे कांदा शेतातून काढून बाजारपेठेत विक्रीस नेणे शेतकऱ्याला परवडेनासे झाले आहे.

यामुळे मागच्या आठवड्यात आळेफाटा येथील कांदा लिलाव संतप्त झालेल्या कांदा उत्पादकांनी बंद पाडले. कांद्याला सरासरी बाजारभाव हा उत्पादन खर्च पाहता किलोला चाळीस ते पंचेचाळीसच्या पुढे हवेत तरच उत्पादन घ्यायला परवडेल.

आळेफाटा उपबाजारातील कांद्याचे दर

मंगळवार दि.१२ डिसेंबर
१ नंबर कांदा:- ३२ ते ३५ रुपये
२ नंबर कांदा:- ३० ते ३२ रुपये
३ नंबर कांदा:- २० ते ३०

शुक्रवार दि.१५ डिसेंबर
१ नंबर कांदा:- २५ ते २७ रुपये
२ नंबर कांदा:- २० ते २५ रुपये
३ नंबर कांदा:- १४ ते १८ रुपये

कांदा उत्पादन करण्यासाठी खर्च वाढलेले आहे.खते, औषधे यांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. तसेच ट्रॅक्टर वहिती खर्च वाढला. मजूर मिळत नाही, त्यात मजुरीचे दरदेखील वाढलेले आहेत. एकूणच उत्पादन खर्च वाढतो.”

जालिंदर औटी
कांदा उत्पादक शेतकरी

“कांदा निर्यात थांबविल्यामुळे कांद्याचे दर कोसळले. तरी निर्यातबंदी उठवत कांदा उत्पादकाला रास्त भाव देण्यात यावा. नाहीतर कांद्यालादेखील खर्चाच्या प्रमाणात हमीभाव द्यावा, अशी कांदा उत्पादकांची मागणी आहे.”

शामराव बढे
कांदा उत्पादक शेतकरी, नगदवाडी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे