दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात महामानवास अभिवादन 

1 min read

निमगाव सावा दि.७ :- दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ व इतिहास विभाग यांच्या वतीने दि.६ रोजी महामानव, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बी. डी. काळे महाविद्यालय, घोडेगाव येथील प्रा. अर्चना अवताडे यांनी प्रतिमा पूजन केले. तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला.

कठीण परिस्थिती असताना देखील डगमगून न जाता परिस्थितीवर मात करून प्रगतीचा मूलमंत्र व आदर्श त्यांनी समाजाला घालून दिला. आपल्या देशाचे संविधान निर्माण करून तळागाळातील घटकापासून ते सवर्णांपर्यंत सर्वांना एक संघटित करण्याचे काम त्यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर दूरदृष्टी असणारा जगातील एकमेव व्यक्ती जर कोण असेल, तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन मोजाड, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राहुल सरोदे व इतिहास विभाग प्रमुख प्रा. नीलम गायकवाड यांनी केले.

यावेळी उपस्थित संस्थेचे पदाधिकारी, तसेच प्राचार्य डॉ. छाया जाधव , प्रा. प्रकाश कांबळे तसेच सर्व प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. शिवाजी साळवे यांनी केले तर, प्रा. सुभाष घोडे यांनी आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे