‘बिबटप्रवण तालुक्यात दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करण्याचे निर्देश द्या’ बिबट प्रजनन नियंत्रण करण्याची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे मागणी

1 min read

पुणे दि.६:- जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि हल्ले रोखण्यासाठी बिबट प्रजनन नियंत्रण करण्यासाठी तसेच या चारही तालुक्यात दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे

यांच्या मागणीसंदर्भात तातडीने बैठक बोलावण्याचे निर्देश केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव आणि वनविभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल यांनी दिले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून मानवी वस्त्यांत बिबट्यांकडून होणारे हल्ले वाढले आहेत. या हल्ल्यात अनेक लहान मुलांसह शेतकऱ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

त्यामुळे बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावणे पुरेसे नाही, तर बिबट प्रजनन नियंत्रण करण्याची गरज आहे अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे सातत्याने मांडत आहेत. याच मागणीच्या अनुषंगाने आज त्यांनी केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेतली.

त्यानंतर केंद्रीयमंत्री यादव यांच्या सूचनेवरून वन विभागाचे महासंचालक गोयल यांचीही भेट घेतली. या भेटीत खासदार डॉ. कोल्हे यांनी बिबट प्रजनन नियंत्रण करावे या मागणीबरोबरच बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करण्याची आणि बिबट-मानव संघर्षाबाबत अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची विनंती केली.

या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री यादव आणि महासंचालक गोयल यांनी तातडीने बैठक बोलावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

घोणसच्या सर्पदंश झालेल्यांना मदतीची मागणी

बिबट्यांच्या हल्ल्याइतकाच घोणसच्या सर्पदंशाचा विषयही गंभीर झाला असून सर्पदंश झालेल्या व्यक्तींना वेळेत उपचार न मिळाल्यास दगावण्याचा धोका असतो.

सर्पदंशावरील उपचारासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे अशा रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार व्हावेत. तसेच बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी अथवा बळी पडलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत केली जाते.

त्याच धर्तीवर सर्पदंशाने मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री यादव आणि महासंचालक गोयल यांच्याकडे केली.

या मागणीची तातडीने दखल घेत केंद्रीयमंत्री यादव आणि महासंचालक गोयल यांनी स्नेक बाईट सेंटर सुरू करता येईल का? किंवा घोणस सर्पदंशाचे प्रमाण कमी करता येईल का? याची चाचपणी करता येईल करण्याचे निर्देशही यादव आणि गोयल यांनी दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे