कुकडी प्रकल्पाचे होणाऱ्या जलनियोजनात आणे पठारभागासाठी उपसा जलसिंचन योजनेचा निश्चितपणे समावेश करण्यात येईल:- मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ
1 min readपुणे दि.२९:- आणे पठार येथील जनमनातील आक्रोश, पाण्याची त्यांना असलेली नितांत गरज लक्षात घेऊन पठार भागावरील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यात कुकडी प्रकल्पाचे होणाऱ्या जलनियोजनात
इतर योजनांबरोबरच आणे पठारभागासाठी उपसा जलसिंचन योजनेचा निश्चितपणे समावेश करण्यात येईल, असे आश्वासन कुकडी प्रकल्पाचे मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ यांनी शिष्टमंडळास दिले.
बुधवार दि. २९ रोजी मुख्य अभियंता कुकडी प्रकल्प यांचे कक्षामध्ये आणे पठारावरील आंदोलकांची पुणे सिंचन भवन येथे बैठक झाली. या वेळी बोलताना डॉ. हेमंत धुमाळ यांनी आश्वासन दिले.
आणे पठारभागावरील आणे, आनंदवाडी, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा गावांची कायमस्वरुपी अवर्षण प्रवण परिस्थितीचा विचार करता या गावांमधील शेतीसाठी फक्त पावसावर अवलंबून राहावे लागत आहे.
त्यामुळे सतत दुष्काळाला सामोरे जावे लागते. येथील पीक पद्धती व दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन शेळी-मेंढीपालन, इत्यादी व्यवसायांमध्ये उत्पन्नाची शाश्वती नाही.
त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाने निराशेच्या गर्तेत अडकलेला आहे. येथील पठार विकास संस्थेच्या वतीने दिनांक १६ नोव्हेंबर पासून धरणे आंदोलन, दिनांक २० नोव्हेंबर पासून साखळी उपोषण व दिनांक २३ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण पुकारले होते.
या आंदोलनात सर्वच गावांतील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी अधिक्षक अभियंता सांगळे, कार्यकारी अभियंता धोडपकर, उपविभागीय अभियंता विलास हांडे उपस्थित होते.आणे पठार पाणी संघर्ष समिती, पठार विकास संस्था व शेतकऱ्यांचं जेष्ठ मंडळ उपस्थित होते.