दाट धुक्यामुळे जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतातूर
1 min readबेल्हे दि.२९:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात सोमवार व मंगळवार (दि.२९) दोन दिवस पहाटे पासून दाट धुके पडले होते. रविवारी झालेल्या अवकाळी पावसानंतर जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दोन दिवस दाट धुके पसरत आहे.
या धुक्यामुळे कांदा पिकावर बुरशी व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी मुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून ज्वारी, मका भुईसपाट झाले आहे.
दोन दिवस सकाळी उशिरापर्यंत धुक्यामुळे संपूर्ण परिसर झाकोळल्या सारखा दिसत होता. मागच्या आठवड्यामध्ये थंडी गायब झाली होती परंतु तीन – चार दिवसांपासून वातावरणात बदल पुन्हा होऊन परिसरात थंडीची लाट पसरली आहे.
अवकाळी पावसाच्या सरी झाल्याने वातावरणात गारवा तयार झाला आहे. नागरिकांनी सकाळी धुक्याचा आनंद घेत ‘मॉर्निग वॉक’ची मजा घेतली. सततच्या बदलत्या हवामानामुळे कांदा या पिकावर ‘मावा’ या किटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.
फवारणी केली तरी आठ दिवसात पुन्हा कांद्यावर माव्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. माव्याचे किटक कांदा पाथीतील पोषणतत्वे शोषून घेतात त्यामुळे कांद्याची वाढ होत नाही. शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च वाढला आहे. वातावरणाच्या या बदलाचा परिणाम पिकावर मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकरी वर्गावर चिंतेच सावट आहे.