आणे पठार उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणाला जलसंपदा विभागाचा हिरवा कंदील; आमरण उपोषण स्थगित 

1 min read

आणे दि.२४:-मुख्य अभियंता (विप्र) डॉ.हनुमंत धुमाळ यांच्या पुणे येथील कार्यालयात बैठकीसाठी प्रयत्न करण्याचे कुकडीच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी बुधवार दिनांक २९ नोव्हेंबर पर्यंत आमरण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा मुक्ताजी दाते यांनी केली.

परंतु जर मुख्यअभियंता धुमाळ यांच्या सोबत बैठकीचे नियोजन झाले नाही तर पुन्हा गुरुवार दिनांक ३० नोहेंबर पासून आहे. त्याच ठिकाणी आमरण उपोषण सुरु केले जाईल असा इशारा मधुकर दाते यांनी दिला.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, १६ नोव्हेंबर पासून आणे पठारवाशियांच उपसा जलसिंचन योजनेसाठी उपोषण सुरू होते. शुक्रवार दि.२४ नोहेंबर रोजी जुन्नरचे तहसिलदार रविंद्र सबनीस यांनी कुकडी प्रकल्पाच्या डिंभे धरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुनिल देवरे व

उपविभागीय अधिकारी विलास हांडे यांच्या समवेत आणे पठारावरील आंदोलनास भेट घेत आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या, त्यांच्यासमवेत आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे उपस्थित होते.

याप्रसंगी भारतीय किसान संघाचे जुन्नर तालुकाध्यक्ष बाळासाहेब दाते, देवस्थान संस्थेचे माजी अध्यक्ष विनायक आहेर, विश्वस्त बाबुराव दाते, उपसरपंच सुहास आहेर, ठकाभाऊ दाते, प्रशांत दाते, तलाठी हेमंत भागवत, आळेफाटा पोलिस स्थानकाचे संदिप फड, शंकर दाते, शंकर आहेर, भागुजी शिंदे, गोरख शिंदे, संजय आहेर व पठारावरील ग्रामस्थ उपस्थित होते.

जलसंपदा विभागाच्या डिंबे धरण विभाग मंचर उपकार्यकारी अभियंता सु.तू.देवर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कुकडी प्रकल्पांतर्गत पाण्याचे फेर नियोजन WAPCOS या केंद्र शासनाच्या त्रयस्थ संस्थेकडून करण्याचे प्रस्तावित असुन त्यास शासनाने दिनांक १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली आहे.

सदर फेर नियोजनामध्ये कुकडी प्रकल्पामधुन नविन योजनाना पाणी उपलब्ध करुन देणे अंतर्गत इतर मागण्यामध्ये आणेपठार उपसासिंचन योजनेसाठी पाण्याची तरतुद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. माननीय कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ व WAPCOS संस्थेमध्ये दिनांक ३ नोव्हेंबर २०२३ रोजी करारनामा झाला असून WAPCOS संस्थेने काम सुरू केले आहे.

त्यासाठी दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ व १९ नोव्हेंबर २०२३ रोजी WAPCOS संस्थेचे मुख्य अभियंता व त्यांच्या टीमने कुकडी प्रकल्पाची पाहणी केली आहे. सदर कामाचा अहवाल ६ महिन्यात अपेक्षित आहे.

WAPCOS संस्थेकडून फेर जलनियोजन प्राप्त झाल्यावर त्यास शासनाची मान्यता घेऊन आणेपठार उपसासिंचन योजनेचे आवश्यक सर्वेक्षण, अन्वेषण व प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम त्वरित हाती घेण्यात येईल.

सदरचे काम प्राधान्याने शासन विचारार्थ असलेने आपणांस विनंती करणेत येते की कृपया आपण आपले धरणे / उपोषण आंदोलन स्थगित करुन प्रशासनास सहकार्य करावे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे