आण्याच्या सोहम नांगरे ची राष्ट्रीय पातळीवरील शालेय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड

1 min read

आणे दि.१७:- आणे (ता.जुन्नर) येथील सोहम सुहास नांगरे याची नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय नेटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. तो सध्या अमृता विद्यालय निगडी या ठिकाणी १० वीत शिकत आहे.

अमृता विद्यालयाच्या संघाने आकुर्डी येथे जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेत विजेतेपद पटकावल्या नंतर जिल्हा स्तरावर बारामती येथे झालेल्या शालेय (१७ वर्षांखालील) नेटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

त्यानंतर राज्य स्तरावरील धुळे येथे झालेल्या स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे नेतृत्व करतांना सोहम नांगरे याच्या संघाने तृतीय क्रमांक (ब्राँझपदक) मिळविले होते. त्याचवेळी महाराष्ट्र संघासाठी झालेल्या निवड चाचणीमध्ये अमृता विद्यालयाच्या सोहम नांगरे याची निवड झाली.

जुन्नर तालुक्यातील आणे गावचा रहिवासी असलेल्या सोहमचे त्याच्या शालेय नेटबॉल स्पर्धेसाठी संघातील निवडीसाठी जुन्नर तालुक्यातून आणि पिंपरी चिंचवड परिसरातून कौतुक होत आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा डिसेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे