समर्थ गुरुकुल च्या संस्कार भांबेरे ची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

1 min read

बेल्हे दि.२३:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे (ता.जुन्नर) या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील संस्कार भांबेरे या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.

संस्कार बद्दल माहिती देताना समर्थ गुरुकुल चे क्रीडा शिक्षक व पुणे जिल्हा खो-खो संघाचे प्रशिक्षक किरण वाघ म्हणाले की,इयत्ता १ ली मध्ये संस्कार ने समर्थ गुरुकुल मध्ये प्रवेश घेतला तेव्हापासूनच त्याला खो-खो ची आवड होती.

अगदी लहान असतानाच आंतर शालेय स्पर्धांमध्ये स्वतःच्या अंगी असलेल्या कौशल्यांची चुणूक त्याने दाखवली.चपळता व चाणाक्षपणामुळे इयत्ता ६ वी मध्ये शालेय स्पर्धेसाठी १४ वर्षाखालील मुलांच्या खो-खो संघात त्याने स्थान मिळवले.

खो-खो हा खेळ शारीरिक दृष्ट्या मेहनतीचा, सातत्यपूर्ण सरावाचा आणि बौद्धिक गुणवत्तेचा व कौशल्याचा खेळ आहे. या खेळातील सूर मारणे,खुंटात गडी बाद करणे,तसेच संरक्षण करताना ३-६-९ हे धावण्याचे कौशल्य वापरून त्याने संघामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.

१० व १६ नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे जिल्हा खो-खो असोसिएशनने किशोर,किशोरी जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी खो-खो स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये समर्थ गुरुकुल च्या १४ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या संघाने सहभाग घेतला होता.

या संघातून ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ दरम्यान चिंचणी ता-डहाणू, जि-पालघर येथे होणाऱ्या ३८ व्या राज्य स्तरीय खो-खो स्पर्धेसाठी संस्कार भांबेरे याची पुणे जिल्ह्याच्या संघात निवड झाल्याची माहिती खोखो असोसिएशनचे प्रशिक्षक किरण वाघ यांनी दिली.

या निवड चाचणी मध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली कौशल्य, निर्णयक्षमता, शारीरिक सक्षमता या सर्व बाबींचा विचार करूनच निवड केली असल्याची माहिती पुणे जिल्हा खो खो असोसिएशन चे सचिव शिरीन गोडबोले यांनी दिली.

यावेळी संस्कारचे वडील भिमाजी भांबेरे हे देखील उपस्थित होते.संस्थेच्या वतीने संस्कार व त्याचे वडील भिमाजी भांबेरे या दोघांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गुळुंचवाडी गावचे सरपंच अतुल भांबेरे यांनी देखील संस्कारला पालघर मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

समर्थ शैक्षणिक संकुलाचे क्रीडा शिक्षक किरण वाघ, डॉ.राजाभाऊ ढोबळे, डॉ.ज्ञानेश्वर जाधव यांनी संस्कार ला मार्गदर्शन केले.संस्कारच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,

कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले तसेच समर्थ शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संस्कार भांबेरे चे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे