बेल्हे- जेजुरी राज्य महामार्ग उदंड झाले गतिरोधक ; ९ किलोमीटर मध्ये चक्क ४२ गतिरोधक
1 min read
बेल्हे दि.१३:- बेल्हे ते मंगरूळ या ९ किलोमीटर मध्ये चक्क ४२ गतिरोधक आहेत. बेल्हे – जेजुरी राज्य महामार्ग क्रमांक ११७ वरील हे चित्र आहे. दोन गतिरोधकातील अंतर लक्षात घेता, ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था या राज्य महामार्गावरून जाणाऱ्या सर्व प्रकार च्या वाहन चालकांची झाली आहे.
बेल्हे-जेजुरी हा राज्य महामार्ग बेल्हे, मंगरूळ, पारगाव, लाखनगाव, लोणी, खडकवाडी, पाबळ, धामारी, जातेगाव, शिक्रापूर, अष्टापुर, शिंदवणे, बेलसर मार्गे जेजुरी असा आहे. हा राज्य महामार्ग वाहन चालकांसाठी अडचणींचा, खूप वाईट आणि बिकट तसेच खड्डेमय असा होता.
त्यामुळे या महामार्गावर वाहनांची वाहतूक तुरळकच होती. तीन वर्षांपूर्वी या रस्त्याचे ‘हायब्रीड अँन्युइटी’ या पद्धतीने रुंदीकरण, नूतनीकरण करण्यात आले. त्यानंतर या रस्त्यावरून सर्व प्रकारची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली. वाहनांचा वेग देखील वाढला.
परिणामी अपघात होऊ लागल्याने गतिरोधकांची मागणी वाढली. बांधकाम विभागाने या संपूर्ण रस्त्यावर बेल्हे ते शिक्रापूर या दोन्ही गावांच्या दरम्यान जवळपास ६९ गतिरोधक आहेत. यापैकी ४२ ठिकाणी प्रत्येकी दोन तर २७ ठिकाणी एक असे गतिरोधक आहेत.
बेल्हे-मंगरूळचा विचार केला तर नऊ किलोमीटर मध्ये ४२ गतिरोधक आहेत. या गतिरोधकांची संख्या पाहता इंधनाची व वेळेची बचत व्हावी या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा विसर सर्वांना पडला असल्याचे दिसून येते.
रस्ता तयार झाल्यानंतर देशभरातील अनेक वाहने या रस्त्यावरून धावताना दिसत होती मात्र या गतिरोधकांची संख्या व स्थिती पाहून वाहतुकीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. या रस्त्यावर आवश्यकतेपेक्षा जास्त व मापदंड विरहित गतिरोधक निर्माण केले आहेत.
त्यामुळे तातडीच्या कोणत्याही कामाला (दवाखाना, अत्यावश्यक काम) गतिरोधकाने वेळेचा अपव्यय होत आहे. त्यामुळे कुठेही वेळेत पोहोचणे अवघड झाले आहे.अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा श्री खंडोबा, जैन बांधवांचे श्री पद्ममनी जैन तीर्थक्षेत्र, मस्तानीची समाधी, अष्टविनायकांपैकी रांजणगाव थेऊर व मोरगाव गणपती, धामोरीचा खंडोबा इ. धार्मिक व पर्यटन स्थळे या महामार्गावर आहेत.
त्यामुळे भाविकांची व पर्यटकांची खूप वर्दळ या नव्या मार्गामुळे वाढली होती.उत्तर भारतातील औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनांच्या वाहतुकीसाठी रांजणगाव, शिक्रापूर, जेजुरी, खेड, चाकण या औद्योगिक क्षेत्रासाठी बेल्हे-जेजुरी हा महामार्ग खूप जवळचा, इंधन व वेळ वाचविणारा आहे.
परंतु अनावश्यक गतीरोधकामुळे या महामार्गावरून जाताना वाहन चालक, मालक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत आणि वाहनांची संख्या देखील रोडावली आहे. एकाच ठिकाणी दोन किंवा तीन गतिरोधक ऐवजी एक गतिरोधक गरज असेल अशा ठिकाणी असावेत अशी वाहन चालकांची मागणी आहे.
या गतिरोधका बद्दल जुन्नर आंबेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना वास्तव सांगून देखील काही बदल झालेला नाही याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
“वेळ, इंधनाची बचत व्हावी सरकारच्या या धोरणाला गतिरोधकांमुळे हरताळ फासला जात आहे. आजारी व्यक्तींना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी खूप वेळ लागतो. आवश्यक सेवांना देखील विलंब होतो. गतिरोधकांची संख्या व उंची पाहून एकदा आलेला वाहन चालक दुसऱ्यांदा या रस्त्यावरून प्रवास करत नाही.”
⁃ जयवंत घोडके, माजी सदस्य पं स. जुन्नर