अजितदादांच्या पाठबळामुळे विकास कामांची घोडदौड: -आमदार नीलेश लंके
1 min read
सांगवी सुर्या दि.७:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाआघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपणही विकास कामांसाठी अजितदादांना साथ देण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी व महाआघाडीच्या माध्यमातून अजितदादांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असून दादांमुळे विकास कामांची घोडदौड सुरू असल्याचे आ. लंके यांनी सांगितले.
तालुक्यातील सांगवी सुर्या येथे १ कोटी १९ लाख ७३ हजार रूपयांच्या कोल्हापुर पध्दतीच्या बंधाऱ्याचे आ. लंके यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आ. लंके म्हणाले, विकास कामांना प्राधान्य देत आपण अजितदादांसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राज्य पातळीवर सत्तेतील सर्व पक्षांमध्ये समन्वय असताना.
जिल्हयात मात्र आपला सबंध शरद पवार यांच्याशी जोडून मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. अजितदादांसोबत जाण्याचा आपला सुस्पष्ट निर्णय झालेला असताना अशा प्रकारच्या वावडया उठविणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
राज्यात अनेक जिल्हयांमध्ये राज्य सरकाराच्या वतीने दुष्काळी स्थिती जाहिर करण्यात आली.
नगर जिल्हयातील एकाही तालुक्याचा त्यात समावेश नसल्याबददल आश्चर्य व्यक्त करून यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली आहे. दुष्काळाबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून तिथेही आमच्या मागणीची दखल घेतली गेली नाही तर न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे लंके म्हणाले.
अपुऱ्या पावसामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार असून पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे टँकर भरायचे कुठे हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांसाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे लंके यांनी स्पष्ट केले.