आमदार निलेश लंके हे शरद पवारांच्या गोटात दाखल झाल्याच्या वावडया; शरद पवारांशी कोणतीही गुप्त बैठक नाही: – सुवर्णा धाडगे
1 min readपारनेर दि.५:- नगर जिल्हयात दुष्काळ जाहिर करावा यासाठी आमदार नीलेश लंके यांनी आवाज उठविताच आ. लंके हे शरद पवारांच्या गोटात दाखल झाल्याच्या वावडया उठविल्या जात असल्याचे स्पष्ट करतानाच शरद पवारांशी आ. लंके किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांची गुप्त भेट झाली नसल्याचे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे यांनी सांगितले. पुण्यासह इतर जिल्हयात दुष्काळ जाहिर होतो. तेथील पालकमंत्री दुष्काळ जाहिर करून घेण्यात यशस्वी होतात. नगर जिल्हयातील प्रस्थापित मात्र त्यात यशस्वी होत नाहीत. हे दुर्देव आहे. आपले अपयश झाकण्यासाठी आमदार नीलेश लंके यांना लक्ष्य करण्यात येत असून लगेचच त्यांचा संबंध शरद पवारांशी जोडला जातो. विकासाच्या मुद्दावर आपण अजितदादा पवार यांच्यासोबत जात असल्याचे आ. लंके यांनी स्पष्टपणे जाहिर केलेले असताना पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच कुठे येतो ? असा सवाल धाडगे यांनी केला आहे. आ. नीलेश लंके हे सत्तेत आहेत. परंतू शेतकरी हितासाठी त्यांनी भूमिका घेतली तर बिघडले कुठे ? मोहटादेवी देवदर्शनादरम्यान आमदार प्रा. राम शिंदे व आ. नीलेश लंके यांची भेट झाली. देवदर्शन यात्रा हा राजकारणाचा भाग नसतानाही महाआघाडीचे घटक म्हणून प्रा. राम शिंदे यांची भेट झाली तरीही शरद पवार यांच्याशी संबंध जोडला जातो. आ. नीलेश लंके यांची जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने समाजमाध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये. आ. लंके यांना कोणतीही गुप्त बैठक घेण्याची आवश्यकता नसल्याचे घाडगे यांनी सांगितले.
शरद पवार आमचे दैवत असून साहेबांच्या सोबत अशी कोणतीही गुप्त बैठक झालेली नाही. गुप्त बैठकीची आम्हाला आवश्यकता नाही. समाज माध्यमातून गैरसमज कसा होईल व दुसऱ्याची बदनामी कशी होईल असा काहींचा हेतू दिसत आहे. सध्या जिल्हयात असलेल्या दुष्काळी प्रश्नाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. अशा समाजहिताच्या कामाला आम्ही महत्व देतो. असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.