जरांगे पाटलांनी उपोषण घेतलं मागे, सरकारच्या शिष्टमंडळाला यश; दिवाळी सर्वांना गोड झाली पाहिजे:- जरांगे पाटील

1 min read

जालना दि.२:- सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी आंतरवाली सराटी येथे गेले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समुदायाला सरसकट आरक्षण देणार असतील तर सरकारला आणखी वेळ देण्यास हरकत नाही असं वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी सरकारला २ जानेवारीपर्यंत वेळ देत उपोषण तुर्तास मागे घेण्याचा निर्णय घेतलाय.

आम्ही सरकारला 2 जानेवारीपर्यंतची वेळ देत आहोत, असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी तूर्तास उपोषण सोडत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे अखेर नऊ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं आहे.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकार तयार आहे. तसं आज ठरलंय. त्यांनी हे मान्य केलंय. हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी विशेष सांगतोय. अर्धवट आरक्षणाचा निर्णय झाला असता तर आपला एक भाऊ नाराज झाला असता तर दुसरा खूश झाला असता.

दिवाळी सर्वांना गोड झाली पाहिजे. एकाला गोड आणि दुसऱ्याला कडू या मताचा मी नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करा. वेळ घ्यायचं तर घ्या. पण सगळ्या भावांना आरक्षण द्या, असं ठरलं. त्यांनी ते मंजूर केलं. ही समिती महाराष्ट्रभर काम करेल. अहवाल देईल. आम्ही त्यांना सांगितलं ही शेवटची वेळ आहे, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

निवृत्त न्यायमूर्ती एम. जे. गायकवाड आणि सुनील शुक्रे यांनी आज अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना कायदेशीर बाजू समजावून सांगितल्या.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. त्यासाठी मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठीचे निकष पार पाडले जात आहेत. त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. थोडा वेळ द्या. एक दोन दिवसात प्रश्न सुटत नाही. आपण मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहोत. त्यामुळे तुम्ही थोडा वेळ द्या, असं या दोन्ही निवृत्त न्यायाधीशांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे