नगर जिल्ह्यातील एसटी बससेवा ठप्प; मराठा आंदोलनाचा लालपरीला फटका; खासगी वाहतुकदारांची चांदी

1 min read

नगर दि.२:- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनात एसटी बसची जाळपोळ तसेच तोडफोडीच्या घटना घडत आहेत. हीच बाब लक्षात घेता महामंडळाने एसटीला ब्रेक लावला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नगर, बीड, पुणे जिल्ह्यातील बहुसंख्य बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नाही. बससेवा बंद करण्यात आली असल्याने ग्रामीण भागातून शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी येणार्‍या, तसेच परगावी जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय झाली. याशिवाय सध्या सहामाही परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. बससेवा बंद असलेल्या संधीचा फायदा खासगी वाहतुकदारांनी उठवला आहे. त्यांच्याकडून अवाच्या सव्वा भाडे आकारून नागरिकांची लूट करण्यात येत आहे.मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागल्याने बीड, सोलापूर जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात पाठविलेल्या बस पुन्हा त्या जिल्ह्यात गेल्या नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे