नामशेष झालेल्या शेकडो वर्षा पूर्वीच्या वस्तूंचे बेल्हयात भव्य प्रदर्शन

1 min read

बेल्हे दि.१:- जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थांनी “आपली संस्कृती, आपला अभिमान” या कार्यक्रमा अंतर्गत जुन्या ऐतिहासिक वस्तूंचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवनेरी भूषण माजी सैनिक रमेश खरमाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

‘जून ते सोन’ या अंतर्गत शेकडो वर्षापूर्वीची शेतीची अवजारे, स्वयंपाक घरातील वस्तू, जुनी नाणी, घरातील वापराच्या वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.
आपल्या जुन्या काळाची, समृद्ध संस्कृतीची व इतिहासाची ओळख आधुनिक विद्यार्थांना व्हावी हा प्रदर्शनाचा उद्देश होता. हे प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

या मध्ये मुसळ, जातं, चिमणी,कंदील, दगडी दिवा, अडकित्ता, काठवड, रवी, जुना रेडिओ, टेप रेकॉर्डर, टेलिफोन, चोपणी, घोंगडी, घंगाळ, धान्य मोजण्याची आठवा, अधुली, चामड्याची चप्पल, जुनी नाणी, पितळी ताट, वाटी, चमचा,तांब्या, कळशी, हंडा, पितळी डब्बे, बैलांच्या घुंगरमाळा, मुसक, चाबूक, विळी,जुनी कुडाची आंघोळीची नाहणी,जुना देव्हारा, अशा अनेक वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.

तसेच विद्यार्थांनी बनवलेल्या चित्रकला हस्त कलाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यात विद्यार्थांनी निसर्ग चित्र,शाडो पेंटिंग, डिझाईन वर्क, चित्र रेखाटन, स्मरण चित्र, कोलाज काम, ग्लास पेंटिंग, पिओपी मॉडेल आदी चित्र हस्तकला प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. संस्थेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे व सर्व संचालक मंडळांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
अतिशय जुनी घरगुती भांडी व वस्तूंची उत्कृष्ट केलेली मांडणी पाहून अक्षरशः भुतकाळ डोळ्यांसमोर उभा राहिला. विशेष म्हणजे मुलांनी आपल्या घरी असलेल्या या जुन्या वस्तू शालेय दालनात इतरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा असा जुना सुंदर संग्रह अनुभवला. हा उपक्रम जगातल्या सर्व शाळांनी करावा व आपली जुनी संस्कृती जतन करावी.”

रमेश खरमाळे, माजी सैनिक


“या प्रदर्शनातून जुन्या संस्कृतीचा ठेवा नव्या पिढीला पाहायला मिळाला.माझ्या ही
जुन्या आठवणी जाग्या झाल्या, प्रदर्शनातील रवी पाहून आईने काढलेल्या रवीच्या लोण्याची आठवण आली.”

कुसुम सहाणे, माजी शिक्षिका व लेखिका बालभारती

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे