भारताच्या एकता व अखंडतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोलाचे कार्य – प्रा.अनिल पडवळ

1 min read

निमगाव सावा दि.३१:- श्री. पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा ते स्वतंत्र भारत देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री अशी ही घेतलेली गगनभरारी ही फक्त आणि फक्त अचाट ध्येयशक्ती, प्रचंड मेहनत आणि जिद्द याच्या जोरावरच. अशा शब्दात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.नितीन मोजाड यांनी प्रास्ताविक केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे असलेले तुकड्या तुकड्यातील विभाजन आणि ते दूर करण्यासाठी प्रसंगी साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब करत भारताला एकसंघ राष्ट्र म्हणून अनेक लहान-मोठी संस्थाने व राज्य खालसा करून त्यांचे भारतात विलिनीकरण करून घेतले. म्हणूनच ते भारताचे “लोहपुरुष” म्हणून ओळखले जातात.

भारताची एकता व अखंडता यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोलाचे योगदान दिले म्हणून हा दिवस देश पातळीवर “एकता दिन” म्हणून साजरा केला जातो, असे प्रा. अनिल पडवळ यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. तसेच मराठी, इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र विषयावर यावर आधारित “सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा” आयोजित केली गेली. या कार्यक्रम प्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीस अभिवादन करून राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ प्रा. निलम गायकवाड यांनी दिली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. संदिपान पवार, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. सुभाष घोडे यांनी आभार प्रदर्शन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे