मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्र उत्सवात स्त्री शक्तीचा जागर; कन्या पूजन, भोंडला, साहित्य पूजन, दांडिया विविध उपक्रम

1 min read

बेल्हे दि.२३:- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) मध्ये नवरात्र उत्सवात विविध उपक्रम घेऊन आदी शक्तीचा जागर करण्यात आला. शालेय दिवसाची सुरुवात रोज विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा व आरती करून करण्यात आली. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता कात्यांयनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री ही देवीची नऊ रूपे साकारली.

विद्यार्थिनींच्या स्वरूपातील दुर्गा मातेच्या विविध रूपांची प्राचार्या विद्या गाडगे च्या हस्ते पूजा करण्यात आली. इयत्ता नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थिनींचे कन्या पूजन करून त्यांना भेटवस्तू व प्रसाद वाटण्यात आला. नर्सरी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी भोंडला व दांडियाचे भव्य आयोजन करण्यात आले. संगीत शिक्षक मनोज सर यांच्या मार्गदर्शनाखाली गीत गायनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी भावगीते, भक्ती गीते, देशभक्तीपर गीते अशा विविध प्रकारची गाणी सादर केली.

याच दरम्यान बेल्हे गावचे ग्रामदैवत मुक्ताई मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात आली. मॉडर्न सखी मंच तर्फे सर्व माता पालकांसाठी भोंडला व दांडियाचे आयोजन करण्यात आले. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल आहे. त्यामुळे आपल्यामध्ये नवीन शक्ती, नवा उस्ताह, नवी उमेद निर्माण होत असते .

सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच एक भाग आहे. भारतीय सण व संस्कृती यांचे दैनंदिन जीवनाशी असणारा सबंध विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमधून सांगण्यात आला. विजयादशमीला खेळाचे साहित्य व पाटी पूजन करून नवरात्र उत्सवाची सांगता झाली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, चेअरमन गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांना नवरात्र उत्सव तसेच दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे