कल्याण- नगर महामार्गावर अपघातात टेम्पोचालक ठार, तीन जखमी

1 min read

ओतूर ता.२२ : उदापूर (ता. जुन्नर) येथे नगर-कल्याण महामार्गावर शुक्रवारी (ता. २०) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टेंपो व कारच्या विचित्र अपघातात टेम्पोचालक ठार झाला, तर शेतमजूर गंभीर जखमी झाला असून, एक महिला शेतमजूर आणि मोटार चालक किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात मनोहर अप्पाराव इंगळे (वय ६१, पावशेपाडा, कल्याण, जि. ठाणे) हा टेंपोचालक ठार झाला, तर नाना गोमा शिंद (वय ३९) हा गंभीर जखमी झाला. तसेच, रमा बाळू शिंद व मोटार चालक शेखर लोहोटे हे किरकोळ जखमी झाले.

नगर-कल्याण महामार्गावरून ओतूरकडून कल्याण बाजूकडे जात असलेला आयशर टेम्पो (क्र. एम.एच. ०४ एफ.यू. ८२८२) चालकाने उदापूर येथे वनविभागाच्या रोपवाटिकेसमोर थांबवला. तेथे रस्त्याच्या कडेला वाहनाची वाट पाहत उभ्या असलेल्या शेत मजुरांना टेम्पोत बसविण्यासाठी चालक मागे आला.

शेतमजुरांना टेम्पोत बसवत असताना अचानक मागून आलेल्या मोटारीची (क्र. एम.एच.४६ ए.पी. ९७१९) त्यांना व टेम्पोला जोरदार धडक बसली. या अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी होऊन ठार झाला व इतर जखमी झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे