माळशेज घाटात एसटी बस – आयशर टेंम्पो ची सामोरा समोर धडक; १५ ते २० प्रवाशी जखमी
1 min readमाळशेज दि.७:- नगर – कल्याण महामार्गावर असणाऱ्या माळशेज घाटात रात्री भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. एसटी बस आणि टेंम्पो यांची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काल शुक्रवार दि.६ रात्री साधारण ११.३० चा सुमारास हा अपघात झाला आहे.
एसटी आणि टेंम्पो धडक एवढी भीषण होती की, ट्रक पलटी झाला तर एसटी बसचे ही मोठे नुकसान झाले आहे. कल्याण – शिरोली नावाची बस ही शिरोली येथे मुक्कामी येत होती. कल्याणवरून जुन्नरच्या दिशेने ही बस येत होती तर टेंम्पो कल्याणच्या दिशेने जात होता. आयशर टेंम्पो या दोन्ही गाड्या समोरासमोर आल्या आणि हा अपघात झाला आहे.जखमी प्रवाशांवर आळे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयशर टेंम्पो चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. अचानक झालेल्या अपघाताने प्रवाशांची चांगलीच धांदल उडाली होती.नगर – कल्याण महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला असून या महामर्गावर दररोज अपघात होऊन लोकांना आपला जीव गमावावा लागत आहे. मागच्या आठवड्यात पाच शेतजुरांना एका गाडीने उडवले होते. त्यातील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला होता. या महामार्गावर दररोज छोटे मोठे अपघात होत असून यावर रस्ते प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी नागरिकांकडून होऊ लागली आहे. मात्र, एसटी आणि ट्रकचा अपघात झाल्याने झोपेत असलेल्या प्रवासी नागरिकांवर “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती” अशी अवस्था पाहायला मिळाली. रात्रीच्या सुमारास अपघात झाल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मदतीने मदत कार्य करण्यात आले. अपघातानंतर माळेशेज घाटात मोठी वाहतुक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.जखमींचा नावे अद्याप समजू शकली नाहीत.