श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पुजाऱ्यांमध्ये लाठ्या-काठ्यांसह लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी; ३६ पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल
1 min readभीमाशंकर दि.१८ :- बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर (ता.खेड) मंदिरातील देवाच्या मूर्तीवर अभिषेक व पूजा करून फुले वाहणारे पुजारी यांच्या दोन गटांत किरकोळ कारणावरून लाठ्या- काठ्यांसह लोखंडी रॉडने हल्ला करीत एकमेकांना मारहाण केली. परिसरात सोमवारी (दि.१६) ही घटना घडली.या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
भीमाशंकर मंदिर येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याच्या प्रकारावरून दोन्ही बाजूंच्या ३६ पुजाऱ्यांवर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शंकर गंगाराम कौदरे (वय ६५, रा. खरोशी, ता.खेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २१ जणांविरोधात तर गोरक्ष यशवंत कौदरे (वय ४०, रा. भीमाशंकर, ता. खेड) यांच्या तक्रारीवरून १५ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एकमेकांविरोधात तक्रारी दाखल झाल्याने भीमाशंकर मंदिरात पूजा करण्यावरून अनेक वर्षांपासून धुमसत असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. भीमाशंकर मंदिर गाभारा तसेच परिसरात असलेल्या शनी मंदिरात पूजा करण्यावरून पुजाऱ्यांमध्ये वाद आहेत. सोमवारी दुपारी भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असताना हाणामारीचा प्रकार घडला.
एका गटाने पूजेला बसलेल्या पुजाऱ्यांना जबरदस्तीने उठवून येथील ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लाठ्या-काठ्या व लोखंडी पाइप तसेच खुर्च्या मारून एकमेकांना जखमी करण्यात आले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
“मंदिरात पूजा सुरू असताना काही जणांकडून अडथळा निर्माण करण्याचे तसेच जाणीवपूर्वक खोडसाळपणा करण्याचे काम केले जात आहे. सगळे लोक आमचेच आहेत. सामोपचाराने तोडगा काढण्यात येईल. मात्र, दांडगाई खपवून घेतली जाणार नाही. सर्वांना एकत्र बसवून चर्चेद्वारे हा वाद सोडविला जाईल.”
ॲड. सुरेश कौदरे, अध्यक्ष, भीमाशंकर देवस्थान