आमदार निलेश लंके आजच्या युगातील आधुनिक श्रावणबाळ:-उपमुख्यमंत्री अजित पवार

1 min read

पारनेर दि.१८:- सर्वसामान्यांसाठी झटणारा, मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेणारा एक जागरूक लोकप्रतिनिधी कसा असावा याचे आमदार नीलेश लंके हे उत्तम उदाहरण आहे.असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.आ. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून व नीलेश लंके प्रतिष्ठाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सवात काढण्यात येणाऱ्या मोहटादेवी दर्शन यात्रेचा शुभारंभ पवार यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, विधानसभेतील २८८ सदस्यांमध्ये आमदार लंके यांचे काम उजवे आहे.आमदार नसतानाही त्यांनी लोककार्यासाठी वाहून घेतले होते.सर्वसामांन्यांप्रती त्यांची असलेली तळमळ पाहूनच लंकेंना जनतेने पाठबळ दिले.आम्हीही त्यांना जवळ केले.आमदार झाल्यापासून लंकेंनी लोक कार्य करण्याचा धडाका लावला आहे. हे पाहून त्याची आमदार म्हणून केलेली निवड किती सार्थ आहे, हे सर्वांच्या लक्षात आले आहे. असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आ. नीलेश लंके यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. आमदार लंकेंना अध्यात्मिक आणि धार्मीक अधिष्ठाण आहे. येथे येणारे बहुसंख्य भाविक बहुजन समाजातून येतात. ‘वसा विकासाचा, विचार बहुजनांचा’ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तेत असण्याचे सूत्र असल्याचे आपण गेल्या आठवड्यात महाराष्ट्रापुढे मांडल्याचे पवार म्हणाले. आमदार नीलेश लंके म्हणाले की, पारनेर शहराची पाणी योजना अंतिम टप्प्यात आहे. दादांनी त्यासाठी मंत्रालयात एक बैठक घेतली तर शहराचा पाणी प्रश्‍न मार्गी लागणार आहे. शासनाच्या निकषात बसत नसतानाही उपजिल्हा रूग्णालयासाठी अजित पवारांकडे खास बाब म्हणून मंजुरीसाठी पाठपुरावा केला. त्यांनी पारनेरच्या उपजिल्हा रूग्णालयास मंजुरी देण्याचे आदेश दिले. चार दिवसांपूर्वीच या उपजिल्हा रूग्णालयास मंजुरी मिळाली आहे.पवारांच्या माध्यमातून अनेक योजना मार्गी लागल्या. कान्हूरपठार उपसा जलसिंचन योजना, पुणेवाडी, जातेगांव तसेच शिवडोह हे सिंचनाचे प्रकल्प यासाठी पवार यांनी मदतीचा शब्द दिला असल्याचे लंके म्हणाले. यावेळी राणीताई लंके, अशोक सावंत, अर्जुन भालेकर, बाबाजी तरटे, बापूसाहेब शिर्के, दादा शिंदे, अ‍ॅड. राहुल झावरे, सुदाम पवार, गंगाराम बेलकर, अशोक कटारिया, कारभारी पोटघन, अ‍ॅड. बाळासाहेब कावरे, मारूती रेपाळे, अमृता रसाळ, विक्रमसिंह कळमकर, दिपक लंके, अनिल पठारे, बाळासाहेब उर्फ ज्ञानेश्‍वर लंके, अजित कदम. दिपक पवार, डॉ. आबासाहेब खोडदे, अशोक घुले, किसन रासकर, खंंडू भुकन, संदीप मगर, भाउसाहेब भोगाडे, संंतोष ढवळे, किशोर थोरात, अनिल गंधाक्ते, संदीप चौधरी, वैजयंता मते, पाकीजा शेख, उमाताई बोरूडे, राजेश्‍वरी कोठवळे, सुनिल करंजुले, संदीप सालके, सुवर्णा धाडगे, पुनम मुंगसे, नितीन आडसूळ, योगेश मते, बाळासाहेब खिलारी, संदीप ठाणगे, डॉ. सादीक राजे यांच्यासह हजारो माता भगिनी यावेळी उपस्थित होत्या. आमदार लंकेंना तुम्ही चार वर्षांपूर्वी निवडून दिले. आतापर्यंत आम्ही १ हजार १०० कोटी रुपयांची कामे केली.अद्याप एक वर्ष बाकी आहे. राज्याचं अर्थमंत्रीपद माझ्याकडे आहे. लंके ज्यावेळी निवडणुकीला सामोरे जातील व मी त्यांच्यासाठी मते मागायला येईल, त्यावेळी या पारनेर तालुक्याला दाखवून देईल की त्याच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत दीड हजार कोटींची कामे झालेली आहेत असा दावा पवार यांनी केला. आर.आर. पाटील यांना लोक अधुनिक गाडगेबाबा म्हणायचे.तसेच आमदार नीलेश लंके अधुनिक श्रावण बाळ आहेत. श्रावण बाळाने त्या काळात ज्याप्रमाणे काम केेले, तसेच काम या युगात नीलेश लंके माता भगिनींसाठी करीत आहेत.नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात मतदारसंघातील माता भगिनींना मोहटा देवीचे दर्शन मिळावे यासाठी आमदार लंके व त्यांचे सहकारी अहोरात्र झटत आहेत.हे कौतुकास्पद असल्याचे पवार म्हणाले.
महावितरणच्या योजनेचा शुभारंभ आज केला. सुमारे ४० कोटी रूपयांची ही योजना आहे. या योजनेअंतर्गत १०० अश्‍वशक्तीचे ३३३ रोहित्रे बसविण्यात येणार आहेत. या योजनेमुळे मतदारसंघाला अखंडीतपणे वीजपुरवठा होणार आहे. नीलेश लंके यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे हे काम होत आहे. तुमचा भाऊ, मुलगा म्हणून नीलेश ही कामे मार्गी लावत असल्याचे पवार म्हणाले. काही पुढारी काय करतात, निवडणूका आल्या की मतं घेण्याकरता त्यांना लोकांची आठवण येते. तसं नीलेशने कधीही दाखवलं नाही. निवडणूका येतील निवडणूका जातील. आपण जनतेशी बांधिलकी ठेवली पाहिजे या पध्दतीने त्याचे काम चाललेलं आहे. मी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे चौकशी केली तर गेल्या वर्षी लंके यांनी सव्वा लाख माता भगिनींना मोहटादेवीचं दर्शन घडवून आणले होते. यंदाही तसेच नियोजन करण्यात आले आहे. एक दमदार आमदार म्हणून नीलेशची ओळख आहे. त्याच पध्दतीने त्याचे काम सुरू असल्याचे पवारांनी नमुद केले. पारनेर शहराच्या पाणी योजनेची फाईल मंत्रालयात आहे. मी मुंबईला गेल्यानंतर यासंदर्भात फाईल बोलवून घेऊन मंजुरी देत बरेच दिवसांपासून नीलेश व पारनेरकरांची मागणी पुर्णत्वाला नेण्यासाठी तुमचा सहकारी म्हणून मी मदत करेल असा शब्द पवार यांनी दिला. पारनेर पाणी योजनेची फाईल मंत्रालयात असून त्याची आठवण करून देण्यासाठी आ. लंके यांनी पवार यांना चिठ्ठीदिली. त्यावर इतकं सगळं देऊनही तुमचा आमदार चिठ्ठी पाठवतोय. असा आमदार पाहिजे असे सांगत पवार यांनी लंके यांचीही फिरकी घेतली. मी आमदार झाल्यानंतर हा काय विकास करणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. मात्र हा मुद्दा खोडून काढण्याचे काम अजितदादांनी केले. दादांच्या माध्यमातून किमान १ हजार १०० कोटी रूपयांचा निधी खेचून आणण्यात आपण यशस्वी झालो. असे आ. लंके यांनी सांगितले.गेल्या वर्षी मोहटादेवी यात्रेसाठी सुप्रियाताई सुळे यांनी हजेरी लावली होती. त्यापूर्वीही शरद पवार यांनी दोनदा हंगे येथे भेट दिली होती. पवार कुटूंबियांपैकी अजित पवार हेच लंके यांच्या घरी भेटीसाठी आले नव्हते. या मोहटादेवी यात्रेच्या निमित्ताने अजित पवार यांनी हजेरी लावल्याबद्दल आ. लंके यांनी कृतज्ञता व्यक्त करीत दादा आम्ही धन्य झालो, आमच्यावर असेच प्रेम राहू द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.अजित पवार यांचे बरोबर साडेदहा वाजता हेलीपॅडवर आगमण झाले. हंगे येथील कार्यक्रम आटोपून ते सभास्थळी येत असताना त्यांच्या वाहनावर २१ जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. मुख्य प्रवेश द्वाराजवळ आल्यानंतर फुलांनी सजविलेल्या उघडया वाहनातून अजित पवार, आ. नीलेश लंके आदी व्यासपीठापर्यंत पोहचले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे