पारनेरच्या ग्रामीण रूग्णालयास उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा; १०० बेडचे सुसज्ज रूग्णालय होणार; आमदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश

1 min read

पारनेर दि.१४:- पारनेर शहरातील ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आले असून या रूग्णालयास आता उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. सध्या या रूग्णालयात ३० बेड असून श्रेणीवर्धन झाल्यामुळे १०० बेडसह जिल्हा रूग्णालयाप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. पारनेर तालुक्यातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आ. नीलेश लंके यांनी पारनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्यासाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला होता. आ. लंके यांच्या मागणीवरून आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून सार्वजनीक आरोग्य सेवा विभागाकडे ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर ग्रामीण रूग्णालयाचे ३० बेडवरून १०० बेडच्या उपजिल्हा रूग्णालयामध्ये विशेष बाब म्हणून श्रेणीवर्धन करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली. पारनेर तालुक्यात विविध आजारांवरील शस्त्रक्रिया अथवा उपचाराच्या ग्रामीण रूग्णालयांमध्ये सुविधा नसल्याने गोरगरीब जनतेला नगर येथे जावे लागत असे. अपंग बांधवांना त्यांना आवष्यक असलेले अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठीही नगरचे हेलपाटे मारावे लागत. गेल्या दोन वर्षांपासून आ. लंके यांनी पुढाकार घेत अपंगांच्या प्रमाणपत्रासाठी पारनेर येथे विशेष कॅम्पचे आयोजन करून अपंगांना दिलासा दिला होता. आता पारनेर येथे उपजिल्हा रूग्णालयास मंजुरी मिळाल्याने अपंग बांधवांची चांगली सोय झाली आहे. पारनेर तालुक्यातील आरोग्याच्या सुविधांच्या मर्यादा कोरोना महामारीच्या काळात स्पष्ट झाल्या. तेंव्हापासूनच आ. नीलेश लंके यांनी पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयास उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून विशेषतः गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय झाल्याने आ. नीलेश लंके यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे