आळे येथील बिबट्या जेरबंद; माणिकडोह बिबट निवारण केंद्रात रवाना
1 min read
बेल्हे दि.११:- आळे (ता.जुन्नर) बालकावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने वन विभागाने या ठिकाणी 15 पिंजरे लावले होते. या पिंजऱ्यात मंगळवार दि.१० रोजी रात्री या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. सदर बिबट्याला माणिक डोह येथील बिबट निवारण केंद्रात हलवण्यात आले असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली. सदर बिबट्या ७ ते ८ वयाचा मादी बिबट आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की आळे (ता.जुन्नर) येथील तितर मळ्यातील शिवांश अमोल भुजबळ या तीन वर्षीय मुलावर बिबट्याने सोमवार दि.०९ रोजी हल्ला करून ठार केल्यानंतर मंगळवार (दि.१०) वनविभागाने घटनास्थळी व परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी १५ ठिकाणी पिंजरे लावले होते तर १५ ठिकाणी ट्रॅप कॅमेरा बसवण्यात आले होते. तोच नरभक्षक बिबट्या आहे का या बाबत माहिती मिळाली नाही.
सदर क्षेत्राचे थर्मल ड्रॉनद्वारे टेहळणी केली जात होती. २४ तास बिबट्याचा शोध घेतला जात होता. व क्षेत्रात २४ तास ग्रस्त घालण्यात येत होती.काल दिवसभरात तालुक्याचे आमदार अतुल बेनके, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, भाजपच्या नेत्या आशाताई बुचके, नेताजी डोके, प्रसन्ना डोके, जुन्नरचे सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर,
वनक्षेत्रपाल वैभव काकडे, सरपंच प्रीतम काळे, उपसरपंच विजय कुऱ्हाडे, गणेश गुंजाळ, दिनेश चौगुले,जीवन शिंदे यांनी भेट दिली. दरम्यान भुजबळ कुटूंबाला वनविभागाच्या वतीने २५ लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
यातील १० लक्ष रुपयांची तातडीची मदत आमदार बेनके यांच्या उपस्थितीत चेकद्वारे भुजबळ कुटुंबियाला देण्यात आली आहे.बिबट्या जेरबंद केल्याने ग्रामस्थांनी वन विभागाचे अभिनंदन केलं आहे परंतु या भागामध्ये अजून तीन बिबटे असल्याची ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.त्यामुळे ही शोध मोहीम सुरू ठेवावी अशी मागणी होत आहे.