बिबट्याच्या हल्यात बालकाचा दुर्दैवी मृत्यू
1 min read
आळेफाटा दि.९:- आळे गावात एका चार वर्षीय बालकावर बिबटयाने हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवार दि.९ सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली होती.या बालकाला आळेफाटा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
या बालकावर डॉक्टर टीम ने तीन तास प्रयत्न करत उपचार केले परंतु बिबट्याने या बालकाच्या चेहऱ्याला, डोक्याला तसेच पाठीला गंभीर इजा केली होती. त्यामुळे या बालकाला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आळे (ता.जुन्नर, जिल्हा.पुणे) गावातील तितर मळ्यात रहात असलेले अमोल भुजबळ यांचा शिवांश हा साडेतीन ते चार वर्षाचा मुलगा अंगणात आजोबा बरोबर खेळत असताणा अचानक समोरील उसाच्या शेतातुन आलेल्या बिबट्याने या मुलाला पकडुन उसाच्या शेतात फरफटत नेले.
या ठिकाणी असलेल्या अविनाश गडगे या तरूणाने मोठी हिम्मत दाखवत बिबट्याच्या मागे पळत जाऊन त्या मुलाला बिबट्याच्या हल्ल्यातुन सोडवले. परंतु या हल्ल्यात लहान बालक गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर आळेफाटा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार चालु होते.
सुरुवातीला बालकाने डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद दिला परंतु काही वेळाने बालकाचा उपचारा दरम्यान दुर्दैवी अंत झाला. या बालकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ पसरली आहे.