कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरात उत्साहात साजरी

1 min read

बेल्हे दि.२५:- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालय, बेल्हे (ता.जुन्नर) या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य रामूदादा बोरचटे, धोंडीभाऊ पिंगट, विश्वनाथ डावखर, रयत शिक्षण संस्थेचे अजीव सेवक व समन्वय समिती सदस्य विद्यालयाचे प्राचार्य अजीत अभंग यांच्या हस्ते कर्मवीर आण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र गाडगे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सावकार पिंगट, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुमीत बोरचटे. जयवंत घोडके, अशोक घोडके, संजय चंगेडिया, राकेश डोळस, कुंडलिक मटाले आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य अजीत अभंग यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शाळा समिती सदस्य धोंडीभाऊ पिंगट यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. या नंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लेझीम पथक, झांजपथक, स्काऊट गाईड पथक, ध्वज पथक, टिपरी नृत्य, पारंपारिक वेशभूषा, वारकरी दिंडी, साडी ड्रील अशा वैविध्यपूर्ण पथकांचा समावेश होता. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रबोधनपर पथनाट्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या पथनाट्यातून सद्य परिस्थितीवर केलेल्या मार्मिक भाष्याने सर्वांच्याच डोळ्यांत झणझणीत अंजन घातले. विद्यार्थ्यांच्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. गावात ठिकठिकाणी ग्रामस्थ, महिला, विविध संस्था संघटना यांनी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. कर्मवीर जयंती निमित्त सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता.कर्मवीर जयंतीचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना सस्नेह भोजन देवून जयंती सोहळा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे