कल्याण-नगर महामार्गावर पिकअपच्या धडकेत दोन महिला ठार; एक गंभीर जखमी
1 min readओतूर दि.२१:- नगर- कल्याण महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला असून गेल्या २४ तासांचे आत झालेल्या तीन विविध अपघातात चौघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर दोघे जखमी झाले आहेत. बुधवार दि.२० रोजी ओतूर (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत कोळमाथा येथे हॉटेल दत्त भेळ समोर पायी चाललेली एक युवती आणि दुचाकीस्वार पती पत्नी यांना एकाच वेळी धडक दिल्याने पायी जाणारी मुलगी आणि दुचाकीवरील महिला ठार झाली. तर दुचाकीस्वार गंभिररित्या जखमी झाल्याने त्यांना उपचाराकामी आळेफाटा येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदर अपघातात ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९) व सविता गीताराम तांबे (वय ४५) या दोन महिला ठार झाल्या असून गीताराम नामदेव तांबे (वय ५२) हे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त तीनही व्यक्तींची घरे घटनास्थळापासून सुमारे २०० मीटर च्या आतच असून ओतूर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान कल्याण नगर महामार्गावर डिंगोरे (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत हॉटेल जीवनदीप समोर एका दुचाकीस्वारास ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याचे खात्रीशीर वृत्त हाती आले आहे. सचिन सुर्यवंशी (वय ४०) रा.डिंगोरे असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.दोन्ही अपघातांची खबर मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे हे सहाय्यक उपनिरीक्षक देवराम धाडवड,पोलीस हवालदार महेश पटारे, नरेंद्र गोराने, सुरेश गेंगजे, नामदेव बांबळे,शामसुंदर जायभाये यांच्या सह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. विशेष म्हणजे हे दोन्ही अपघात दि.२० रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडले असून दि.१९ रोजी याच मार्गावर कृष्णकुंज निवास समोर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पीकअप (एम एच १४ एच यु ३०६९) ने दुचाकी (एम एच ०७ बी २७७२) ला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार पती पंकज सोपान वामन (वय ३७) रा. काळवाडी,पिंपळवंडी (ता. जुन्नर ) हे जागीच ठार झाले आहेत. तर त्यांची पत्नी प्रियांका पंकज वामन या गंभिर जखमी झाल्या आहेत,दरम्यान २४ तासांचे आत घडलेले तीनही अपघात मन सुन्न करणारे असून कल्याण नगर महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा? असे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरू पहात आहे.
विशेष म्हणजे ता.१९ रोजी झालेला अपघात व ता.२० रोजी झालेला अपघात हा पिकअप टेम्पोनेच केलेला आहे.कोळमाथा येथे झालेला अपघातातील पीकअप धडक दिल्यानंतर पलटी झालेला आहे. अलीकडच्या काळात पिकअप गाड्यांच्या अपघातांची मालिकाच सुरू असून बेशिस्तपणे वेगात व कधीकधी सरळ रस्ता असूनही. नागमोडी वळणे मुद्दाम घेत चाललेल्या पिकअप मुळे अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी केलेल्या पहानित आढळून आले आहे, अशा वाहन चालकांवर पोलीस प्रशासनान कठोर कारवाई करणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली आहे.